नागपूर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २५ मे रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात ते शहरात सुरू होणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा भूमिपूजन करणार आहेत. त्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आला आहे.
गृहमंत्री शहा २५ मेच्या संध्याकाळी नागपूरला पोहोचतील. त्यानंतर रात्री विश्रांती घेऊन, २६ मे रोजी सकाळी चिंचोली येथे उभारण्यात येणाऱ्या ‘नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी’च्या उभारणीसाठी भूमिपूजन करतील. याचबरोबर, राष्ट्रीय कर्करोग संस्थानात (National Cancer Institute) होणाऱ्या ‘स्वस्ति निवास’ प्रकल्पाचाही शिलान्यास केला जाणार आहे.
प्रशासन सज्ज, आयुक्तांची बैठक-
गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बिदरी यांनी सर्व यंत्रणांना वेळेत तयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री नागपूरसाठी महत्त्वाचे असणारे प्रकल्प आणि आरोग्यविषयक सुविधा सुरू करत असल्यामुळे, स्थानिक पातळीवर या भेटीचे विशेष महत्त्व मानले जात आहे.