Published On : Sun, Sep 1st, 2019

शहराचा चौफेर विकास आता रोजगारावर भर – केंद्रीयमंत्री गडकरी

केंद्र सरकारच्या स्वयंरोजगार प्रेरणा अभियानाचा श्रीगणेशा

नागपूर: रोजगारासाठी नवनवे दालन सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहराचा चौफेर विकास झाला असून आता शहर बेरोजगारमुक्त करण्यास गती देण्यात येणार असल्याचे केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्य उद्योग व रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी नमुद केले. 50 हजार लोकांना रोजगाराचे आश्‍वासन दिले होते, त्यापैकी 28 हजार तरुणांना रोजगार दिल्याची पुस्तीही त्यांनी दिली.

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाच्या एमएसएमई विकास संस्था नागपूर व स्वयंम फाऊंडेशनतर्फे जुना भंडारा मार्गावरील परंपरा सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात गडकरी यांच्या हस्ते स्वयंरोजगार प्रेरणा अभियानाला प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रा. अनिल सोले, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, एमएसएमईचे संचालक पी. एन. पार्लेवार, ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे अध्यक्ष व संशोधक डॉ. हेमंत जांभेकर, स्वयंम फाऊंडेशनचे अनिल चव्हाण उपस्थित होते.

प्रत्येकाकडे रोजगाराच्या चांगल्या योजना असते. या योजनांना मूर्त रुप देण्यासाठी एमएसएमई मार्गदर्शन करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, रोजगार वाढविण्यासाठी सरकार सदैव पाठीशी आहे. महिलांनी उद्योजिक म्हणून पुढे येण्यासाठी रेडीमेड गारमेंट निर्मिती आदीकडे वळावे.

उद्योगासाठी कुठल्या योजना आहे, त्यासाठी कर्ज कसे घ्यावे, याबाबत या अभियानातून मार्गदर्शन मिळेल. महापालिका उद्योजिका भवन तयार करीत असून मंत्रालयातर्फे 10 कोटी रुपये देण्यात येत आहे. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाचे मार्केटिंग चांगले झाले पाहिजे. उद्योग व्यवसाय पुढे जावा, गरीबी दूर करण्याचा प्रयत्न या मंत्रालयामार्फत होत आहे. देशात रोजगारनिर्मितीसाठी 80 हजार कोटींचे कर्ज तीन विदेशी वित्त संस्थांनी मंजूर केले आहे. ग्रामीण व कृषी क्षेत्रात रोजगार वाढविण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. सध्या ग्रामीण व कृषी क्षेत्रात 75 हजार कोटींचा टर्नओव्हर होत आहे. तो 150 हजार कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. अशाप्रकारची शिबिरे घेण्याचे आवाहन त्यांनी आमदार, नगरसेवकांना केले.

या अभियानात कॅनरा बॅंक, ग्रीनक्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनसह अनेक स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी बेरोजगारांच्या नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे लोकार्पण गडकरी यांनी केले. सोशल मिडिया विश्‍लेषक व ग्रीनक्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे सचिव अजित पारसे यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. बेरोजगारांच्या नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे लोकार्पण करताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, शेजारी अनिल चव्हाण, अजित पारसे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, एमएसएमईचे संचालक पार्लेवार, संशोधक डॉ. हेमंत जांभेकर व इतर.

केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या स्वयंरोजगार अभियानातून राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाला डिजिटल प्रणालीचे सहकार्य आहे. यासाठीच संकेतस्थळाचे गडकरींचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. संकेतस्थळावर बेरोजगारांना नोंदणीसाठी डिजिटली साक्षर होण्याची गरज आहे. स्वयंरोजगार अभियान यशस्वी करण्याची प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.

अजित पारसे, सचिव, ग्रीनक्रूड ऍन्ड बायोफ्यूल फाऊंडेशन व सोशल मिडिया विश्‍लेषक.