| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Nov 15th, 2020

  बेरोजगारीचा प्रश्न गंभीर, रोजगारावर भर देणार ! : जोशी

  भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी

  भंडारा/गोंदिया : नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप-मित्र पक्षाचे उमेदवार नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी रविवारी (ता. १५) भंडारा, गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांनी दोन्ही जिल्ह्यातील पदवीधरांच्या प्रश्नांनावर भविष्यात प्राधान्याने काम करणार असल्याचे सांगितले.

  यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार बाळाभाऊ काशीवार, चरण वाघमारे, भंडारा-गोंदिया जिल्हा संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, लाखनी, साकोली आणि गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, देवरी, आमगाव आणि गोंदिया या शहरांमध्ये भेट देऊन कार्यकर्त्यांच्या बैठकीला महापौर संदीप जोशी यांनी संबोधित केले. नागपूर पदवीधर मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पदवीधरांच्या समस्या वेगळ्या आहेत. दोन्ही जिल्हे नक्षलग्रस्त आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षल समस्येचा प्रभाव अधिक आहे. या जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील युवांच्या हाताला काम मिळाले तर नक्षल चळवळ अशीच खिळखिळी होईल. त्यामुळे शिक्षित आणि पदवीधरांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका यामध्ये मोठी आहे. पक्षाची आणि उमेदवाराची भूमिका प्रत्येक युवा मतदारापर्यंत पोहचविण्याचे कार्य प्रत्येकाने प्रामाणिकपणे करावे, प्रत्येक मतदाराला विश्वास द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

  आमदार डॉ. परिणय फुके यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर उद्योगांवर भर द्यायला हवा. येथील हातांना काम देण्यासाठी सुशिक्षीत बेरोजगारांना उद्योगाकडे वळविणे आणि त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या विजयासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

  साकोली येथे भाजपा कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. साकोली नगराध्यक्ष धनवंत राऊत, मनीषा काशीवार, तालुका अध्यक्ष लखन बारावे,शहर अध्यक्ष किशोर पोगडे, महामंत्री नरेंद्र वाडीभस्मे, लाखनी येथील बैठकीत के. डी. बोपचे, राजेश बांते, धनंजय घाटबांधे, अशोक येवले, सत्यवान वंजारी, गोपाल गिरीपुंजे, देवरी येथील बैठकीत माजी आमदार संजय पुराम, महेश जैन, गोंदिया जिल्हा सचिव अनिल अग्रवाल, देवरी तालुका अध्यक्ष अनिलकुमार येरणे उपस्थित होते. आमगाव येथे माजी आमदार केशवराव मानकर आणि रघुवीर सूर्यवंशी यांच्या घरी भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. दौऱ्यात त्यांना शिक्षकांनीही त्यांच्या प्रश्नांचे, समस्यांचे निवेदन दिले. त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे महापौर संदीप जोशी यांनी आश्वासन दिले.

  गोंदिया शहरात आमदार विनोद अग्रवाल आणि माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची महापौर संदीप जोशी यांनी भेट घेतली. निवडणुकीसंदर्भात यावेळी दोन्ही नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली. यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीलाही संबोधित केले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145