Published On : Sun, Nov 15th, 2020

ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

नागपूर – ऑस्ट्रेलियन दुतावासाचे उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल्ल यांनी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेषत: ‘कोरोना’ कालावधीत संघाने राबविलेल्या मदतकार्याबाबत त्यांनी जाणून घेतले. खुद्द उच्चायुक्तांनीच याबाबत माहिती दिली.

रविवारी सकाळी फॅरेल्ल संघ मुख्यालयात गेले. यावेळी ऑस्ट्रेलियन दुतावासाचे उपसचिव जॅक टेलर , कॉन्सेल जनरल सारा रॉबर्टस हेदेखील उपस्थित होते. त्यांनी संघाच्या एकूण कार्याबाबत जाणून घेतले. ‘कोरोना’ कालावधीत देशभरात मदतीचे नियोजन कसे होते याचीदेखील त्यांनी माहिती घेतली. यानंतर उच्चायुक्तांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या महाल येथील निवासस्थानीदेखील भेट दिली. सोबत रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचेदेखील दर्शन घेतले. कोरोनाच्या कठीण काळात संघाने समाजाला सक्रियपणे सहकार्य केले. याबाबत सरसंघचालकांनी मला विस्तृतपणे माहिती दिली, असे फॅरेल्ल यांनी सांगितले.


याअगोदरदेखील विदेशी उच्चायुक्तांच्या भेटी
मागील काही वर्षांत संघ मुख्यालयात अनेक देशाच्या उच्चायुक्तांनी भेट दिली आहे. सिंगापूरचे तत्कालिन उप उच्चायुक्त जोनाथन टो हे संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सहभागी झाले होते. याशिवाय ब्रिटीश दुतावासाचे कॉन्सेलर किरेन ड्रेक, जर्मनीचे राजदूत वॉल्टर लिंडनर यांनीदेखील संघ मुख्यालयाला भेट दिली होती.