Published On : Tue, Sep 5th, 2017

भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत 605 अभ्यासक्रमांचा समावेश –प्रा. राम शिंदे

Advertisement

मुंबई: राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास वर्गातील दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने 605 अभ्यासक्रमासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जलसंधारण आणि विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली आहे.

केंद्र सरकार दहावीच्या पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या वरील प्रवर्गातील निवासी आणि अनिवासी विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबवते. या योजनेअंतर्गत विविध 605 अभ्यासक्रमातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग राज्य सरकारच्या या निर्णयाने मोकळा झाला आहे. राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल, हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या राज्य सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

या 605 अभ्यासक्रमामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तुशास्त्र, कृषी, आयुर्वेद, फलोत्पादन, संगणक शास्त्र, जेनेटिक सायन्स यासारख्या विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांच्या पदवी आणि द्विपदवीसाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. अभ्यासक्रमांची यादी वेबसाईटवर पाहता येईल, अशी माहिती प्रा. शिंदे यांनी दिली आहे.