Published On : Tue, Sep 5th, 2017

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांनी काम करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

मुंबई: भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड कार्यक्षमता असते. आपण मनापासून ठरविल्यास आपल्या नेमणुकीच्या कार्यक्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता आपल्यात आहे. त्यानुसार सर्वसामान्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी काम करा, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन निवड झालेल्या भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांना दिला.

2016 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरमध्ये नवीन निवड झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी आयएएस अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय सेवेत येण्यामागच्या उद्देशाविषयी जाणून घेतले. नेमणुकीस असलेल्या जिल्ह्यातील समस्या, अधिकाऱ्यांनी तेथील परिस्थितीचे केलेले निरीक्षण आदींवर चर्चा केली. कुमार आशीर्वाद यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीची गरज व्यक्त केली. डॉ. इंदुराणी जाखड यांनी नागपूर येथील स्मार्ट सिटी प्रकल्प, जिल्ह्यातील सांसद ग्राम योजना, आदर्श गाव योजना आदी प्रकल्पांची उत्कृष्ट अंमलबजावणी होत असल्याचे निरीक्षण व्यक्त केले.

कोकणाची भौगोलिक परिस्थिती वेगळी असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना खूप वाव आहे. तेथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी अभिनव गोयल यांनी व्यक्त केलेल्या निरीक्षणावर दिली.
मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकार ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करीत आहे. कोकणमधील दमणगंगा खोऱ्यातून मराठवाड्यात पाणी आणण्याचा हा प्रकल्प असून यासाठी सुमारे 25 हजार कोटीची गुंतवणूक लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी चर्चेदरम्यान सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे रब्बीच्या उत्पादनात झालेली भरीव वाढ, अमरावती जिल्ह्यातील टेलिमेडीसीन योजना, नागपूर जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांचे यश आदींविषयी चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की, शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर थेट भाजीपाला विक्री केंद्रे सुरु केल्यामुळे तसेच धान्य महोत्सव आयोजित केल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होत आहे. राज्यात 50 टक्के इतकी मोठी नागरी बाजारपेठ उपलब्ध असल्याने ग्रामीण भागाला विकासाची मोठी संधी आहे. त्या अनुषंगाने नूतन आयएएस अधिकाऱ्यांनी काम करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य शासनाने गेल्या काही काळात रोजगार उपलब्धतेच्या अनुषंगाने धोरणात्मक बदल केल्याबाबत माहिती देताना श्री. परदेशी यांनी सांगितले की, मागणीप्रमाणे पुरवठा या तत्त्वावर प्रथम उद्योगांच्या मागणीप्रमाणे युवकांना प्रशिक्षित करण्यात येते. त्यामुळे रोजगार उपलब्धतेत भरीव वाढ झाली आहे.
यावेळी नूतन आयएएस अधिकारी योगेश कुंभेजकर, डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाल, डॉ. पंकज आशिया, डॉ. इंदुराणी जाखड, कुमार आशीर्वाद, अभिनव गोयल, सौरभ कटियार यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.