Published On : Fri, May 1st, 2020

कारखाने सुरू झाल्याने बुटीबोरीवासी कोरोनाच्या सावटाखाली

नागपूर– देशावर कोरोना नावाच्या आलेल्या वैश्विक महामारीमुळे देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यातील सर्व व्यवसाय व उद्योग बंद करून लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली होती.त्यामुळे शासनाचा महसूल बुडल्याने राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला.यामुळे शासनाने राज्याची आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील उद्योगधंद्यांना काही अटीसह परवानगी दिली होती.मात्र नागपूर जिल्हा हा रेड झोन मध्ये असून ही बुटीबोरी औधोगिक क्षेत्रातील कारखान्याला शासनाने परवानगी दिल्याने बुटीबोरीवासीयांनी कोरोनाच्या सावटाखाली येण्याची भीती व्यक्त केली आहे.

बुटीबोरी स्थानिक प्रशासनाने लॉक डाऊन चे कठोर निर्बंध पाळत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपली संपूर्ण नगरपरिषदेचे टीम कामाला लावली.गावातील पाणी,स्वच्छता सोबत आरोग्याची काळजी घेण्यासोबत कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये याकरिता पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेतले.गावातील संपूर्ण प्रभाग सॅनिटायजर ने निर्जंतुक करून घेतला.मात्र आता बुटीबोरी औधोगिक क्षेत्रातील कारखान्यांना सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने नगरावर कोरोनाचे संकट घोंगावू शकते या विचाराने बुटीबोरिवासियांना व्हेंटिलेटर असल्याचे स्वप्न पडू लागले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेड झोनमधील जिल्ह्यात जीवनावश्यक सेवा देणारे उद्योगा व्यतिरिक्त सर्व व्यवसाय,उद्योग व प्रतिष्ठाने हे लोकडाऊन पर्यंत बंद राहील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती;असे असतानाही बुटीबोरी येथील उद्योजकांना कारखाने सुरू करण्याची परवानगी दिलीच कशी हा प्रश्न मात्र गुलदस्त्यातच असल्याचे दिसून येते.

बुटीबोरी हे आशिया खंडातील सर्वात मोठे पंचतारांकित औधोगिक क्षेत्र आहे.येथे प्रत्येक राज्यातील व्यक्ती काम करतो.त्याचबरोबर येथे चंद्रपूर,वर्धा,नागपूर सारख्या मोठ्या शहरासह परिसरातील लहानसहान खेड्यातूनही कामावर येणारा कामगार आहे.येथील बहुसंख्य कंपनीचा ९० टक्के स्टाफ हा नागपूर वरूनच येणारा आहे.व नागपूर शहर हे रेड झोन मध्ये असून येथून कंपनीत येणारा व्यक्ती हा कोरोनाचा सायलेंट कॅरियर ठरणार नाही का? त्यामुळे प्रशासनाने नागपूर जिल्ह्यातील उद्योगांना परवानगी देऊन कोरोनाच्या खुल्या संसर्गाचा जणू काही परवानाच दिला असे चित्र सध्या बुटीबोरी येथे दिसून येते.

कारखानदारांकडून नियमांची पायमल्ली:- बुटीबोरी औधोगिक क्षेत्रातील उद्योग सुरू करण्यासाठी कारखानदारांना शासनाने काही नियम पाळण्याचे बंधने घातली आहे.ज्यात कंपनी सुरू करण्या अगोदर कंपनीतिल यंत्र,मशीन व पूर्ण परिसर सॅनिटायजर करून निर्जंतुकीकरण करणे,बाहेरून येणाऱ्या कामगारांना कंपणीतच राहण्याची व्यवस्था करणे इत्यादी.परंतु बुटीबोरी औधोगिक क्षेत्रातील बहुतांश कंपन्या सुरू करण्याअगोदर कुठल्याप्रकारचे निर्जंतुकीकरण केले नाही.तसेच अनेक कंपन्यांतील कामगार हे नागपूर वरून रोज बसेस मध्ये भरून येत असताना एका सीटवर दोन दोन कामगार बसून येत असल्याने सोशल डिस्टन्ससिगचा फज्जाच उडत असल्याचे दिसून येत आहे.

अनेक कामगार येतात नागपूर वरून:- येथील के इ सी,नारायना बिस्कीट व अनेक कंपनीतील कामगार हे नागपूर वरून रोज येथे कंपनीत येतात.नागपूर हे कोरोनाच्या रेड झोन मध्ये येत असून हे कामगार कोरोनाचा सायलेंट कॅरियर ठरू शकतात.त्यामुळे भविष्यात बुटीबोरी व परिसरात कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नियमबाह्य प्रवाश्यावर कार्यवाही का करीत नाही:- देशात कोरोनाने खूप मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे आदेश ही आहेत.परंतु कंपनीत येणारे कामगार बसमध्ये एका सीटवर दोन दोन बसून येत असताना पोलीस त्यावर कुठलीही कार्यवाही का करीत नाही हे मात्र जनतेला पडलेले न उलगडणारे कोडेच आहे.