Published On : Fri, Oct 2nd, 2020

कचर्‍यात मूल्य निर्मिती करणे शक्य : नितीन गडकरी

Advertisement

एका हिंदी वृत्तवाहिनीची चर्चा

नागपूर: कचर्‍याचे संपत्तीत रुपांतर करण्यासाठी कचर्‍यात मूल्यनिर्मिती झाली पाहिजे. त्यामुळे कचर्‍याचे महत्त्व वाढेल आणि प्रदूषणासंदर्भातील आपल्या समस्या लवकर सुटण्यास मदत होईल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

आज एका हिंदी वृत्तवाहिनीवरील ‘स्वास्थ्यमंत्र’ या विषयावरील चर्चेत सहभागी झाले असताना ना.गडकरी बोलत होते. या चर्चेत प्रख्यात अभिनेते व महानायक अमिताभ बच्चन, भूमी पेडणेकर, बिट्टू सहगर आणि प्रणव राय सहभागी झाले होते. कचर्‍यापासून ते जंगलांचे आणि वाघांचे संरक्षण, स्वच्छ पर्यावरण, राख, जैविक इंधन अशा सर्वच विषयांना गडकरी यांनी हात घालत आपले मुद्दे अतिशय प्रखरपणे मांडले.

सांडपाण्यापासून मिथेन निर्मिती व त्यावर शहर बस चालविणे, ऑर्गेनिक कार्बनचे प्रमाण वाढविणे, ते कसे वाढविता येईल, त्यामुळे शेतकर्‍यांना कसा फायदा होणार हे गडकरींनी अत्यंत थोड्या शब्दात पण स्पष्टपणे मांडले. काही देश कचरा नाही म्हणून आयात करण्याचा विचार करतात, पण आपण कचर्‍यातून कला आणि संपत्ती मिळवू शकतो. काहीच वाया जात नाही. कचर्‍याचे ‘व्हॅल्यू अ‍ॅडिशन’ केले तर महत्त्व वाढणार आहे. घरातील कचर्‍याचे सेंद्रीय खत तयार करून आपल्याच बगिच्यांमध्ये वापरले तर प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण स्वच्छ राहील. पर्यावरण स्वच्छतेसाठी आम्ही वचनबध्द असल्याचे या चर्चेत त्यांनी सांगितले.

देशात अनेक राज्यांमध्ये बांधण्यात येणार्‍या महामार्गांवर मोठ्या वृक्षांचे रोपण करून तेथेही महामार्ग प्राधिकरण मागे नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच औष्णिक वीज केंद्रातून निघणारी राखही रस्त्यांच्या बांधकामात वापरून आम्ही राखेचे महत्त्व वाढविले आहे. आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, गैरसरकारी सामाजिक संस्था यांनी कचर्‍यातून संपत्ती निर्माण करण्यासाठी प्रयोग करावे, त्यामुळेही पर्यावरण स्वच्छ होण्यास मदत होईल. यावेळी ना. गडकरी यांनी मांडलेल्या 15 मिनिटांच्या देश आणि जगभरातील दृष्टिकोनावर सारेच मंत्रमुग्ध झाले.

मुंबईतील पाणी तुंबण्याच्या प्रकाराला रोखण्याचा प्लॅनही तयार आहे. मुंबईतील तुंबणारे पाणी नाशिकला आणून शेतकर्‍यांना देण्यासाठी योजना तयार केली पाहिजे. पुढच्या पाच वर्षात मुंबईचे पाणी तुंबणे थांबेल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना या संदर्भात पत्र दिले असल्याचेही ना. गडकरी यांनी या चर्चेत सांगितले. महानायक अमिताभ यांनी पाणी तुंबल्यानंतर आपल्यावर कसा प्रसंग गुदरतो हे सांगितले. एकूणच ही चर्चा चांगलीच रंगली होती.