Published On : Thu, Mar 23rd, 2017

संयुक्त राष्ट्र संघाच्या सहकार्याने नियोजन विभागात वॉर रूम – सुधीर मुनगंटीवार

Advertisement


मुंबई:
संयुक्त राष्ट्र संघाच्या सहकार्याने नियोजन विभागात वॉर रूम स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

काल सह्याद्री अतिथीगृहात युनायटेड नेशन्सचे भारतातील प्रमुख समन्वयक यूरी अफानासिएफ यांनी अर्थमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस संयुक्त राष्ट्राच्या भारतातील प्रशासकीय प्रमुख राधिका कौल बत्रा, वन सचिव विकास खारगे, अर्थ व सांख्यिकी संचालक प्रफुल्ल सोहळे आदी मान्यवर उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्र संघाच्या मदतीने नियोजन विभागात सुरु करण्यात येणाऱ्या वॉर रूममध्ये आयआयटी मुंबई, मुंबई विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग तसेच चेंबूरच्या पॉप्युलेशन सायन्स संस्थेचा सहभाग घेतला जाईल, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मानव विकास निर्देशांकात समाविष्ट असलेल्या १२५ तालुक्यांपैकी २५ तालुक्यात रोजगार निर्मितीची एक विशेष योजना राबविण्याचा शासनाचा मानस असल्याचे तसेच या माध्यमातून हे तालुके रोजगारयुक्त तालुके करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली आहे. या कामात देखील संयुक्त राष्ट्र संघाचे तांत्रिक सहकार्य घेतले जाईल अशी माहिती मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.


या वॉररूमसाठी संयुक्त राष्ट्र संघाकडून आवश्यक असलेले मनुष्यबळ आणि तांत्रिक सहाय्य केले जाईल, असे यूरी यांनी सांगितले.

बैठकीत “शाश्वत विकासाचे ध्येय” या पुस्तकाचा मराठी अनुवाद अर्थमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यात संयुक्त राष्ट्र संघाने १७ संकल्प आणि १६९ उद्दिष्ट्ये निश्चित केली आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने निश्चित केलेल्या उद्दिष्टपूर्तीमध्ये महाराष्ट्राने अग्रस्थानी राहण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देशही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिले.