कोल्हापूर:‘मोठमोठ्या जाहीरातींद्वारे केवळ विकासाचा आभास निर्माण केला जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्यांना आणि व्यापा-यांना मोठा फटका बसला आहे. आपण याला लोकशाही मानत नाही.’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकारवर तोफ डागली आहे. ते सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर असून आज त्यांच्या दौ-याचा दुसरा दिवस आहे.
आज कोल्हापूर येथे व्यापा-यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी यांनी त्यांना आवाहन केले की, ‘शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही देशोधडीला लावणार हे सरकार आहे. अशा सरकार विरोधात मुंबई येथे मोठा मोर्चा काढा. मी तुमचे नेतृत्व करतो.’ यावेळी त्यांनी उपस्थित व्यापा-यांना ‘तुम्ही आंदोलनासाठी तयार आहात का?’, असे विचारले. त्यावर सर्वांनी होय असे उत्तर दिले. ‘जानेवारी महिन्यात मुंबईमध्ये मोर्चा काढू’, असे म्हणत उद्धव यांनी सरळ सरळ भाजपविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
उद्धव ठाकरे निवडणुकीच्या तयारीला?
काल शुक्रवारपासून उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा, शेतकरी, व्यापारी तसेच कामगारांशी संवाद, पत्रकार परिषदा अशा भरगच्च कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. या दौ-याच्या निमित्ताने 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ते आत्तापासूनच कामाला लागल्याची चर्चा आहे.
मागील विधानसभेच्या निवडणुकीत एकट्या कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेचे 10 पैकी 6 आमदार निवडून दिले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पश्चिम महाराष्ट्राकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष दिले आहे, असे जाणकारांचे मत आहे.


