Published On : Wed, Sep 20th, 2017

उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकरांनी दिली शिवसेनेत येण्याची ऑफर- नितेश राणे

Advertisement


मुंबई: नारायण राणेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिलेली नाही असे स्पष्टीकरण शिवसेनेने दिल्यानंतर नितेश राणेंनी याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीच गणपतीदरम्यान शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याचे राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसचे खासदार हुसैन दलवाई हे टक्केवारी खाणारे खासदार आहेत. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नेतृत्त्व मानत नाही असे वक्तव्य राणेंचे थोरले सुपुत्र व माजी खासदार निलेश राणे यांनी केली.

नारायण राणे घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपल्या भविष्यातील योजनांबाबत कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार आहेत. मात्र, त्याआधी अफवांचा बाजार गरम झाला आहे. तसेच राणे यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाल्याचे मानण्यात येत आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असलेल्या नारायण राणेंचा राजकारणातील अभिमन्यू झाल्याची चर्चा राजकीय वर्तूळात झडत आहे. त्यावर राणेंनी आपल्या बाजारात मोठी मागणी आहे. अगदी शिवसेनाही आपल्याला पायघड्या घालायला तयार असल्याचे नारायण राणेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते. मात्र, त्यानंतर शिवसेनेतील दुस-या फळीतील नेत्यांनी त्याचे खंडन केले होते.

या पार्श्वभूमीवर राणेंचे आमदार पुत्र नितेश यांनी एका वाहिनीवरील चर्चेत, मिलिंद नार्वेकरांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याचे सांगितले. नितेश म्हणाले, मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची सावली म्हणूनच शिवसेनेत ओळखले जातात. मग नार्वेकर कोणाच्या सांगण्यावरून आम्हाला शिवसेनेत येण्याची ऑफर देतील असे सर्वांना वाटते. मात्र, आम्हाला शिवसेनेत जायचे नाही त्यामुळे या विषयी आम्ही अधिक बोलणे टाळले आहे.

अशोक चव्हाणांचे नेतृत्त्व मान्य नाही
दरम्यान, राणेंचे थोरले चिरंजीव व माजी खासदार निलेश राणेंनी आज अशोक चव्हाणांवर तोफ डागली. निलेश म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नेतृ्त्त्व मानत नाही. आम्ही सोनिया गांधी व राहुल गांधींचे नेतृत्त्व मानतो. आम्ही आताही काँग्रेसमध्येच आहोत. मात्र, चव्हाणांच्या खाली काम करणार नाही.