
File Pic
पुणे: पुण्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दोन परदेशी आणि दिल्ली येथील एका युवतीकडून मोठ्या रक्कमेच्या पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या पाच जणांविरुद्ध येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुटका केलेल्या तीन युवतींपैकी एक रशियन तर दुसरी उझबेकिस्तान व तिसरी तरुणी दिल्लीतील आहे. याप्रकरणी राहुल ऊर्फ राजू, जॉन ऊर्फ प्रकाश शर्मा ऊर्फ जतीन चावला, सागर, टोनी व सुरेश अशा पाच जणांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी नितीन तेलंगे यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांनी हे हायप्रोफाईल रॅकेट उघडकीस आणले. मिळालेल्या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला, त्यावेळी या तरूणी आढळून आल्या.
पोलिस निरीक्षक संजय पाटील म्हणाले, ‘येरवडा परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये एजंटमार्फत अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्याव्यवसाय सुरू झाल्याची खबर मिळाली होती. खात्री केल्यावर सापळा रचण्यात आला आणि छापा टाकून रॅकेट उध्वस्त केले. राहुल उर्फ राजू हा या रॅकेटचा सूत्रधार असून, तो एजंटसच्या मदतीने देशातील तसेच परदेशातील मुलींना अधिक पैशांचे आमिश दाखवून वेश्याव्यवसायाला प्रवृत्त करत होता.
या मुलींच्या नावाने विविध हॉटेलमध्ये रूमबुकिंग करून, ग्राहकांना पाठवून आर्थिक फायदा घेत होता. या गुन्ह्यातील पीडित युवतींना रेस्क्यू होम, महंमदवाडी, हडपसर येथे सोपवण्यात आले आहे.
वरील कारवाईसाठी गुन्हे विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पाटील, शितल भालेकर, चंद्रकांत जाधव, नितीन तेलंगे, नामदेव शेलार, नितीन लोंढे,, सचिन कदम, प्रदिप शेलार, विजय काळे, प्रमोद म्हेत्रे, गितांजली जाधव, सरस्वती कागणे, रूपाली चांदगुडे, सचिन शिंदे आदींनी कारवाईत भाग घेतला.