Published On : Mon, Apr 3rd, 2017

कर्जमाफीबाबत भूमिका प्रामाणिक असेल तर उध्दव ठाकरेंनी संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे!

Advertisement

जालना: कर्जमाफीबाबत शिवसेनेची भूमिका संशयकल्लोळाची आहे. कर्जमाफीसाठी शिवसेनेचे धोरण प्रामाणिक असेल तर, त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामे फेकून सरकार बाहेर पडावे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

संघर्ष यात्रेच्या चौथ्या दिवशी जालना येथे आयोजित शेतक-यांच्या जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारचे उदासिन धोरण, भाजपची नकारात्मक भूमिका आणि शिवसेनेच्या ढोंगीपणावर टीकेची झोड उठवली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी कर्जमाफीसाठी राजीनामे देण्याच्या वल्गना केल्या होत्या. परंतु, मुंबईचे महापौरपद मिळताच त्यांचे राजीनामे हरविले आहेत. 2014 मध्ये विरोधी पक्षात असताना शिवसेनेच्या आमदारांनी मराठवाड्याचा दौरा करुन शेतक-यांसाठी 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी केली होती. परंतु, सत्तेत आल्यानंतर त्यांना आपल्याच मागणीचा विसर पडला असून, ते शेतक-यांना साधी 50 हजार रुपयांची मदत देखील मिळवून देवू शकलेले नाही. त्यामुळेच मध्यंतरी उध्दव ठकरेंनी मराठवाड्यात येऊन शेळ्या, मेंढ्या वाटपाचा कार्यक्रम घेतला. शिवसेनेचे सारे लक्ष केवळ मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक महानगरपालिकेवर असून, ग्रामीण भागाशी त्यांना काहीही घेणे-देणे नाही. त्यामुळेच उध्दव ठाकरे जिल्हा परिषदेच्या प्रचाराला देखील फिरकले नाहीत, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली.

याप्रसंगी त्यांनी भाजपच्या उदासिन भूमिकेवरही तोफ डागली. ते म्हणाले की, विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेमुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला असून, त्यामुळेच आजवर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याबाबत टाळाटाळ करणारे मुख्यमंत्री आता ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतक-यांशी संवाद साधायला तयार झाले आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी 3 एप्रिलपर्यंत धोरणात्मक प्रश्न मागविले असून, राज्यभरातील शेतक-यांनी मुख्यमंत्र्यांना “कर्जमाफी देणार की नाही?” एवढाच प्रश्न पाठवावा, असे आवाहन विखे पाटील यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी विदर्भ, मराठवाड्यात फिरुन शेतक-यांना अनेक आश्वासने दिली. परंतु, आता सरासरी 9-10 शेतकरी रोज आत्महत्या करीत असतानाही पंतप्रधानांना महाराष्ट्राचा दौरा करायला वेळ नाही.

या सभेला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, नसीम खान, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आझमी, माजी मंत्री राजेश टोपे, डी. पी. सावंत, आ. सुनिल केदार, आ. कुणाल पाटील आ. जितेंद्र आव्हाड, आ. राहुल बोंद्रे, माजी आमदार सुरेश जेथलिया, कैलास गोरंटयाल आदी उपस्थित होते.