
नागपूर : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे विकासकामे आणि विविध योजनांसाठी राखीव असलेला निधी दुष्काळ निवारणासाठी वळवण्याची मागणी केली आहे. सध्या सुरू असलेल्या अनेक विकास प्रकल्पांना स्थगिती देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
राज्यात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. मात्र, दुष्काळाच्या परिस्थितीत सरकारने प्राधान्यक्रम बदलणे आवश्यक आहे. बुलेट ट्रेनसह काही प्रकल्पांची सध्या गरज नसून त्यासाठीचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. तसेच इतरत्र वळवलेला किंवा अनावश्यक खर्च होणारा निधीही दुष्काळ निवारणासाठी वापरण्याची मागणी त्यांनी केली.
ठाकरे यांनी लवकरच विदर्भातील दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याचे सांगितले. त्याआधी आदित्य ठाकरे दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतील. दुष्काळग्रस्त भागात शिवसैनिकांनी हेल्प सेंटर सुरू करून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या 31 हजार कोटी रुपयांच्या मदतीपैकी प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत किती रक्कम पोहोचली, याचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. पंचनामे आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करायला लावू नये. तातडीने मदत जाहीर करून ती प्रत्यक्षात पोहोचवावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.




