Published On : Mon, May 14th, 2018

राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा पुरावा, औरंगाबाद हिंसाचारावरुन उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

Advertisement

मुंबई : औरंगाबाद हिंसाचारावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ”किरकोळ कारणांवरून दंगल व्हावी आणि शेकडो कोटींचे नुकसान व्हावे हे काही योग्य नाही. ही कारणे पुचाट आहेत व दंगली निदान अशा कारणांमुळे तरी भडकू नयेत. राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा हा पुरावा आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

शिवाय, ”शहराला गेल्या कित्येक महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाहीत. इतक्या मोठ्या संवेदनशील शहरास आयुक्त मिळू नये हेच मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याचे अपयश आहे. ‘भाजप’धार्जिणा अधिकारी गळास लागत नाही तोपर्यंत पोलीस आयुक्त नेमायचा नाहीअसा पण मुख्यमंत्र्यांनी केला आहे काय?”, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

– काय आहे आजचे सामना संपादकीय?

संभाजीनगरात दंगलीचा भडका उडाला असून हिंसाचारात दोन जण ठार झाले आहेत. दंगल सरळ सरळ जातीय आहे. हिंदू व मुसलमानात उडालेला हा भडका असून शहराचे जनजीवन साफ विस्कळीत झाले आहे. या दंगलीचे नेमके कारण काय? दंगलीस जबाबदार कोण? भडका उडाला, पण ठिणगी नक्की कोठे उडाली? याबाबत संभ्रम आहे. दंगल भडकण्याची चार कारणे समोर आली, ती हास्यास्पद आहेत.

१) शहरात अनधिकृत नळ कनेक्शन जोडणी व तोडण्यावरून किरकोळ वाद झाला व त्यातून पेटवापेटवी झाली.

२) गांधीनगरमधील एका गॅरेजमध्ये मोबाईल देण्या-घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून दंगल पेटली.

३) आठ दिवसांपूर्वी शहरातील शहागंज भागात उन्मेष हुलिए या राजाबाजार येथे राहणाऱया तरुणाने एकाकडून आंबे विकत घेतले. ते आंबे खराब निघाल्यामुळे तो हे आंबे परत करण्यास गेला. तेव्हा दुकानदाराने ते आंबे फेकून देऊन उन्मेषला मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला व दंगल पेटली.

४) पानपट्टीच्या अनधिकृत टपऱया हटवल्याने लोकं चिडली व दंगलीस सुरुवात झाली.

अशी विविध कारणे आता समोर आली आहेत, पण आंबे, मोबाईल, पानाची टपरी अशा किरकोळ कारणांवरून दंगल व्हावी आणि जान मालाचे शेकडो कोटींचे नुकसान व्हावे हे काही योग्य नाही. ही कारणे पुचाट आहेत व दंगली निदान अशा कारणांमुळे तरी भडकू नयेत. राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा हा पुरावा आहे. भीमा-कोरेगाव दंगलीने महाराष्ट्राची राखरांगोळी झालीच आहे. नगरमधील खुना-खुनीचे शिंतोडेही मंत्रालयाच्या भिंतीवर उडाले आहेत व मुख्यमंत्री म्हणतात परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. संभाजीनगरात आजही जमावबंदी आहे. शहर पेटवणारे नक्की कोण आहेत याच्या चौकशा व त्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समित्या निरर्थक आहेत. आजही औरंग्याची व निजामाची वंशावळ येथे थैमान घालते आहे असाच या दंगलीचा अर्थ. शहागंजची बाजारपेठ पूर्ण पेटवली गेली. पाचशेहून जास्त वाहने, घरे व दुकाने पेटविण्यात आली. शहागंज परिसरात जगनलाल छगनलाल बन्सिले या ७० वर्षांच्या आजारी वृद्धास धर्मांध दंगलखोरांनी जिवंत जाळले. ही इतकी मस्ती व माज या लोकांत येतो कोठून? पंतप्रधान मोदी नेपाळातील मंदिरात ‘हिंदू-हिंदू’ असे प्रदर्शन करीत असताना संभाजीनगरात औरंगाबादवाल्यांनी हे असे निर्घृण हल्ले केले. संभाजीनगरात गेल्या कित्येक महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाहीत. इतक्या मोठय़ा संवेदनशील शहरास आयुक्त मिळू नये हेच मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याचे अपयश आहे.

‘भाजप’धार्जिणा अधिकारी गळास लागत नाही तोपर्यंत पोलीस आयुक्त नेमायचा नाही असा पण मुख्यमंत्र्यांनी केला आहे काय? पोलिसांना नेतृत्व नाही, त्यामुळे ते दिशाहीन झाले आहेत. संभाजीनगरमध्ये अनेक गल्ल्या व मोहल्ले असे आहेत की, तेथे सैतानही जायला धजावणार नाही. अशा भागांमध्ये जिवावर उदार होऊन घुसलेल्या पोलिसांवर दंगलखोरांनी हल्ले केले. हे हल्ले ठरवून झाले व ज्या पद्धतीने पंधरा मिनिटांत पेट्रोल बॉम्बचे हल्ले सुरू झाले ते पाहता दंगलीची पूर्वतयारी झालीच होती हे उघड आहे. राज्यातील गुन्हेगारीचे थैमान पाहता कायदा आणि सुव्यवस्था या दोन्ही शब्दांना महाराष्ट्रातून जणू तडीपार केले गेले आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात राज्य पेटले असताना सरकार अजगरासारखे निपचित पडून होते. तेथे बंदुकांचे बार उडाले नाहीत व कुणावर लाठी उगारली गेली नाही, पण संभाजीनगरात पोलीस आयुक्त हजर नसताना पोलिसांनी गोळीबार केला. हेसुद्धा कायदा-सुव्यवस्थेचे गौडबंगाल आहे. संभाजीनगरची दंगल जातीय, धार्मिक की आणखी काही? त्यात आम्हाला पडायचे नाही, पण शहरातील अनेक मोहल्ले कोणत्याही दंगलीसाठी सदैव सज्ज आहेत हे पुन्हा दिसले. संभाजीनगरचा भडका का उडाला या प्रश्नाचे खरे उत्तर शोधण्याची जबाबदारी सरकारची आहे. आंबा, मोबाईल, पानटपरी ही दंगल भडकण्याची कारणे ठरू नयेत. पापी औरंग्याचे थडगे तेथे आहे व त्या थडग्यावर जाऊन राजकारणी गुडघे टेकतात, नमाज पढतात, हे भडकण्याचे कारण ठरले असते तर आम्हाला आनंद झाला असता.