
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत पक्षबांधणी, आगामी राजकीय घडामोडी आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना व निवडणूक चिन्हाच्या वादावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना न्यायालयीन प्रक्रियेबाबत आशावादी भूमिका मांडली. शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ या पारंपरिक निवडणूक चिन्हावर पक्षाचा हक्क कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, कोणत्याही परिस्थितीत हे चिन्ह दुसऱ्या गटाच्या ताब्यात जाणार नाही. तसे झाले नाही, तर ते चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भातील वादावर 2022 पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अलीकडेच या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी पार पडली असून आता अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटन अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवावा, पक्षाची ताकद तळागाळात अधिक मजबूत करावी आणि आगामी राजकीय आव्हानांसाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.




