Published On : Tue, Mar 26th, 2019

यु. पी. एस. मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

Advertisement

राज्याच्या मुख्य सचिवपदी अखेर यु. पी. एस मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमएमआरडीए, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण अशा विविध ठिकाणी मदान यांनी काम केले आहे.

दिनेशकुमार जैन यांच्या दिल्लीतील नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदासाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू होती. दिनेशकुमार जैन यांची देशाच्या लोकपालमध्ये बिगर न्यायिक सदस्य म्हणून निवड झाली होती.

सेवाज्येष्ठतेनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, केंद्रात माजी सैनिक कल्याण खात्याच्या सचिव संजीवनी कुट्टी, केंद्रीय महसूल सचिव अजय भुषण पांडे, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांचा क्रम लागतो.

यापैकी गाडगीळ यांना यापूर्वीच मुख्यसचिवपद नाकारण्यात आले. पांडे व कुट्टी हे दोन्ही अधिकारी केंद्रात सचिवपदावर असून राज्यात येण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे मदान, मेहता व संजय कुमार यांच्यातच चुरस होती.

मदान ऑक्टोबरमध्ये तर मेहता सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे मुख्यसचिवपदी मुख्यमंत्री कोणाची वर्णी लावतात याकडे प्रशासनाचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी मुख्य सचिवपदी यु. पी. एस मदान यांची निवड करण्यात आली आहे. यु. पी. एस मदान १९८३ च्या बॅचमधील आयएएस अधिकारी आहेत.