Published On : Thu, Sep 12th, 2019

स्टार बस च्या धडकेने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भिलगाव येथील नागलोक बुद्ध विहार च्या समोरुन दुचाकीत पेट्रोल भरायला जात असलेल्या सेवानिवृत्त कर्मचारीच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्टार बस ने दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी 12 दरम्यान घडली असून मृतक दुचाकीस्वाराचे नाव सत्यनारायण सीमाचलान पैडी वय 65 वर्षे रा शिवकृपा नगर भिलगाव ता.कामठी असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर मृतक इसम हा स्वतःची ऍक्टिवा गाडी क्र एम एच 40 बी एम 7268 ने पेट्रोल भरायला जाण्यासाठी नागलोक मार्ग पार करून जात असता कामठी हुन नागपूर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्टार बस क्र एम एच 31 सी ए 6219 ने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार जागीच मृत्यू पावला.घटना घडताच आजू बाजूच्या नागरिकांसह मृतकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच धाव घेतली दरम्यान संतप्त नागरिकांचा राग बघून स्टार बस चालकाने घटनास्थळा हुन बस सोडून पळ काढण्यात यश गाठले.

यशोधरा नगर पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले तसेच सदर घटनेसंदर्भात अज्ञात स्टार बस चालका विरुद्ध भादवी कलम 279, 304 अ अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.