Published On : Wed, Mar 21st, 2018

शौचालय पाणी प्रकरणात दोन अधिकारी निलंबित


नागपूर: जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना शौचालयातील नळाचे पाणी पाजल्या प्रकरणासंदर्भात द्वि-सदसीय चौकशी समितीच्या अहवालानुसार स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी योग्यरित्या न हाताळयाल्याबदल शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश किसनराव धोटे, केंद्र प्रमुख बबन ढवळे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी छाया इंगोले यांचेवर विभागीय चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

जिल्हा परिषद शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे यांनी कर्तव्यात कसुर केल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराविरुध्द सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून तपासाच्या अधिन राहून संबंधित कंत्राटदाराला एक वर्षाकरिता काळया यादीत टाकण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. अशी माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

शौचालय पाणी प्रकरण या माध्यमांमध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीची दखल घेण्यात येवून शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना शौचालयातील नळाचे पाणी पाजल्या प्रकरणासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी द्वि-सदसीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीचा अहवालानुसार शिक्षण विस्तार अधिकारी व नागपूर पंचायत समितीचे केंद्र प्रमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती छाया इंगोले यांचेवर विभागीय चौकशीच्या अनुषंगाने ज्ञापन व जोडपत्र सादर करण्यात आले आहे.