Published On : Thu, Dec 5th, 2019

‘रणरागिनी’ साठी घोडस्‍वारी करणा-या दोन मर्दानी

खासदार महोत्‍सवात दुस-या दिवशीही वाखाणले गेले महानाट्य

झाशीची राणी लक्ष्‍मीबाई अतिशय कणखर होती. घोडस्‍वारी, तलवारबाजीत निपुण होती. राणी लक्ष्‍मीबाईची मर्दानगी मंचावर खरीखुरी साकारण्‍यासाठी छोट्या मनूची भूमिका साकारणारी अनघा भावे आणि मोठेपणची राणी लक्ष्‍मीबाई साकारणारी राधिका देशपांडे यांनी घोडस्‍वारी करत मर्दानगीचा उदाहरण महानाट़यातून सादर केले.

सहाय्य फाउंडेशन प्रस्‍तुत ‘झांशी की राणी – रणरागिणी’ हे झांशीची राणी लक्ष्‍मीबाई यांचा जीवनपट उलगडणारे महानाट्य सध्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवादरम्‍यान ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावर सुरू आहे. मंगळवारी या हिंदी महानाट्याचा पहिला प्रयोग झाला तेव्‍हा रसिकांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते घोडस्‍वारी करणा-या या दोन मुलींनी. बुधवारी झालेल्‍या प्रयोगातही या दोघी रसिकांच्‍या कौतूकास पात्र ठरल्‍या. गुरुवारी, 5 डिसेंबरला याच मैदानावर या नाटकाचा तिसरा प्रयोग होणार आहे.

अनघा भावे हिने खास या नाटकासाठी घोडस्‍वारी शिकून घेतली. त्‍याकरीता तिने प्रहार मिलिटरी स्‍कूलमध्‍ये काही काळ त्‍याचा सरावही केला. सोमलवार हायस्‍कूल रामदासपेठ मध्‍ये शिकत असलेल्‍या अनघाचे आणखी एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे ती पहिल्‍यांदाचा एकढ्या मोठ्या रंगमंचावर अभिनय करते आहे. ती म्‍हणाली, या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिली होती. खूप सा-या मुलींमधून त्‍यांनी माझी निवड केली. झाशीच्‍या राणीबद्दल खूप ऐकले, वाचले आणि पाहिले होते. तिचे धाडस आणि लहानपणापासून तिच्‍या अंगी असलेला अॅटीट्यूड खूप आवडायचा. पहिल्‍यांदाच एवढी मोठी भूमिका मिळाली आणि मी ती करू शकली, याचा अधिक आनंद आहे, असे ती म्‍हणाली.

मोठेपणची राणी लक्ष्‍मीबाई साकारणारी राधिका देशपांडे हिने याआधी अनेक नाटक व मालिकांमध्‍ये काम केले आहे. तिला लहानपणापासूनच राणी लक्ष्‍मीबाईबद्दल आकर्षण होते. लक्ष्‍मीबाईची भूमिका करण्‍याचे तिचे स्‍वप्‍न ‘रणरागिनी’ या महानाट्याच्‍या माध्‍यमातून पूर्ण झाल्‍याचे तिने सांगितले. ती म्‍हणाली, दोन महिन्‍यांपूर्वी नचिकेत म्‍हैसाळकर यांचा फोन आला तेव्‍हा मी मी घोडस्‍वारी शिकत होते. संभाजी मालिकेसाठी तलवारबाजीचेही प्रशिक्षण घेत होते. झाशीच्‍या राणी संदर्भात नचिकेतने जेव्‍हा विचारले तेव्‍हा आनंदाला पारावार राहिला नाही. आई आणि आजीमुळे माझ्यात शौर्य, वीररस उपजतच आहे. पण माझे लहानपणीचे स्‍वप्‍न तीस-पस्‍तीस वर्षानंतर पूर्ण झाल्‍याचा अधिक आनंद आहे, असे राधिका म्‍हणाले.

या महानाट्याचे दिग्दर्शक नचिकेत म्‍हैसाळकर यांनी दोघींच्‍याही कामाचे खूप कौतूक केले. राधिका चांगली अभिनेत्री असून तिला हॉर्स रायडिंग येत असल्‍यामुळेच तिचा या भूमिकेसाठी विचार करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. लहान मनूच्‍या भूमिकेसाठी ऑडिशन घेतल्‍या आणि अनघाने घोडस्‍वारी करायला तयारी दाखवली. तिने खूप मेहनत घेतली, असे नचिकेत म्‍हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक सघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, दत्तात्रय होसबळ, रामदास आंबटकर, श्रीधर गाडगे, आमदार मोहन मते, प्रवीण दटके आदींची उपस्थिती होती.