Published On : Fri, Jun 8th, 2018

मुख्यमंत्री आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोका, मंत्रालयात आली धमकींची दोन पत्रे

File Pic

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यात एप्रिलमध्ये पोलिसांच्या कारवाईत मोठ्या संख्येने नक्षलवादी मारले गेले होते. त्यानंतर आलेल्या धमक्यांच्या दोन पत्रांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, त्यांचे कुटुंबीय आणि गडचिरोलीतील कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाईल आणि आम्ही त्या घटनेचा बदला घेऊ, अशा धमक्या देणारी पत्रे आल्याने मंत्रालयात खळबळ उडाली. धमक्या देणारी दोन पत्रे मंत्रालयात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेविषयी अधिक सतर्क राहण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाने सुरक्षा यंत्रणेला दिले आहेत. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.

आम्ही ‘मार्क्स’च्या विचारांनी प्रेरित लोक आहोत. आमच्यातील काही जणांना ठार करून तुम्ही आमचा विचार संपवू शकणार नाही.

गडचिरोलीत जे काही घडले त्याचा हिशेब नक्कीच होईल, अशा आशयाची भाषा त्या पत्रांमध्ये वापरण्यात आली असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ही पत्रे नेमकी कुठून आली याचा कसून तपास गृह विभागाकडून सध्या केला जात आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने या विषयावर अधिक बोलणे उचित होणार नाही. मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत गृह विभाग सातत्याने आढावा घेत असतो. यंत्रणा अधिक सतर्क करण्यावर भर देण्यात आला आहे, असे गृह विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.