
दुबई : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सुरक्षा यंत्रणांनी उडणारे दोन ड्रोन पाडले. या घटनेत एका भारतीय नागरिकासह चार जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दुबई मीडिया कार्यालयाने सामाजिक माध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरात संशयास्पदरीत्या उडणारे दोन ड्रोन सुरक्षा दलांनी निष्क्रिय केले. त्यानंतर हे ड्रोन विमानतळाजवळील परिसरात कोसळले. ड्रोनचे अवशेष पडल्यामुळे आसपास असलेल्या काही नागरिकांना दुखापत झाली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की या घटनेत घानाचे दोन नागरिक आणि एका बांगलादेशी नागरिकाला किरकोळ दुखापत झाली आहे, तर एका भारतीय नागरिकाला मध्यम स्वरूपाची दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतरही दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतूक नियमितपणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानतळ परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून ड्रोन नेमके कुठून आले आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
दरम्यान, पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशात तणावाचे वातावरण कायम आहे. या संघर्षामुळे अनेक देशांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.








