
नागपूर : शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी व वाहनचोरीच्या दोन गुन्ह्यांचा गुन्हेशाखा युनिट क्र. ५ ने यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक नगर परिसरातील गजानन मंदिरामागे, म्हाळगी नगर येथे राहणारे लक्ष्मीदास भरतदास वैष्णव (वय ३५) यांनी ९ मार्च रोजी सायंकाळी घराला कुलूप लावून कुटुंबासह विजय नगर, कळमणा मार्केट येथील नातेवाईकांकडे गेले होते. या दरम्यान ९ ते १० मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरातील आलमारीत ठेवलेली १२ हजार रुपये रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच होंडा अॅक्टिव्हा (एमएच ४९ एडी १४५४) अशी एकूण सुमारे ७ लाख ८३ हजार रुपयांची मालमत्ता चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हेशाखा युनिट क्र. ५ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पेट्रोलिंगदरम्यान संशयित हालचाली करणाऱ्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. ते अॅक्टिव्हा (एमएच ४९ एडी १४५४) आणि सुझुकी अॅक्सेस (एमएच ४९ बीजी ९३९८) या दुचाकींवर फिरताना आढळले.
त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून पिवळ्या व पांढऱ्या धातूचे दागिने आणि एक मोबाईल फोन आढळून आला. सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला; मात्र सखोल चौकशीत त्यांनी हुडकेश्वर परिसरातील घरफोडी तसेच अॅक्सेस मोपेड चोरी केल्याची कबुली दिली.
या कारवाईत आरोपींकडून ७८.०८ ग्रॅम सोन्याचे दागिने, १४४.४३ ग्रॅम चांदीचे दागिने, दोन मोपेड दुचाकी आणि एक मोबाईल फोन असा एकूण ७ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना पुढील कारवाईसाठी मुद्देमालासह हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम तसेच गुन्हेशाखा युनिट ५ चे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.








