Published On : Sat, Jul 20th, 2019

पंढरपुरचं तुळशी उद्यान- एक नंबर… वारकऱ्यांची उर्त्स्फुत प्रतिक्रिया

Advertisement

मुंबई,: तुळस असे ज्याचे द्वारी, लक्ष्मी तेथे वास करी, येवोनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे, जे तुळसी घालती उदका, ते नर पावती ब्रम्हसुखा, नामा म्हणे पंढरीनायका… असं म्हणत विठ्ठल आणि तुळशीचे नाते संतांनी अधोरेखित केले आहे. विठ्ठल आणि कृष्णाला तुळस प्रिय..म्हणून भक्तांनाही ती वंदनीय, पुजनीय.. तुळस विविध विकारांवर गुणकारी म्हणून तिचं आयुर्वेदातील महत्व अनन्यसाधारण… अशा तुळशीचा महिमा जर अनुभवायचा आणि पहायचा असेल तर पंढरपुरच्या तुळशी उद्यानाला एकदा आवर्जुन भेट द्यायलाच हवी…. नुकतीच आषाढीची वारी झाली. त्यानंतर मंत्रालयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली वारकरी शिष्टमंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तिथेही एका सुरात वारकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली… “पंढरपुरचं तुळशी उद्यान… नंबर एक…. तुळशी उद्यानामुळे पंढरपुरात स्वर्गच निर्माण झालाय…पंढरपुरला विठ्ठलाच्या चरणाशी उभारलेलं हे तुळशी उद्यान या शहराला नवी ओळख देत आहे… अशा एक ना अनेक उर्त्स्फुत प्रतिक्रिया वारकरी शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी दिल्या…

ते खरं ही आहे. वेगवेगळ्या प्रजातींच्या तुळशी एकाच ठिकाणी पहायच्या असतील तर पंढरपुरच्या तुळशी उद्यानात त्या पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे ती वन विभागाने. नमामी चंद्रभागा अभियानात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात एक हेक्टर परिसरात यमाई तलावानजीक या तुळशी वृंदावनाची निर्मिती करण्यात आली आहे… उद्यानात प्रवेश करताच भाविकाचं लक्ष वेधून घेते ती २५ फुटांची विठ्ठल मुर्ती,, भिंतीवरची शिल्पे, प्रतिमा केवळ अप्रतिम. मन प्रसन्न करणारी, जे.जे. स्कुल ऑफ आर्टस् च्या कलाकारांनी रेखाटलेली चित्रे आपल्याशी बोलताहेत असा भास निर्माण होतो इतकी ती जिवंत साकारली आहेत. संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवतांना, शिवाजी महाराजांची ऐतिहासिक भेट, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वारी दृष्य, पादुका घेऊन जाणारी बैलगाडी, अनेक संतांचा जीवनपट या तैलचित्रातून खुप सुंदररित्या साकारण्यात आला आहे…

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई , संत रोहिदास, संत सखुबाई, ग्रामगीता गाणारे संत तुकडोजी महाराज, रंजल्या गांजल्याची सेवा करण्याचा संदेश देणारे संत गाडगे बाबा यांचे तैलचित्र पाहून मनाला शांती मिळते, त्यांचा जीवनपट या माध्यमातून व्यक्त होतो , सर्वधर्म समभावाचा संदेश यातून जनमाणसात प्रसारित होतो….

जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर रोजगार निर्मिती हा तुळशी उद्यान निर्मितीमागचा उद्देश – सुधीर मुनगंटीवार

भुलोकीचे वैकुंठ असं ज्या शहराचं वर्णन आहे तो पंढरीचा विठ्ठल आणि तुळस आपल्या सर्वांसाठी खुप पुजनीय आहे. तुळशी पाने मंजुळांसह तोडून त्याचे हार किंवा त्याचे गुच्छ तयार करून ते विठ्ठलचरणी वाहण्यासाठी भाविकांना विकायचे यातून या भागात मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. याला अधिक चांगले स्वरूप देऊन यातील रोजगार क्षमता वाढवणे आणि जैवविविधतेचे रक्षण करणे या दोन्ही उद्देशाने वन विभागाने पंढरपुरात अत्यंत देखणे असे तुळशी उद्यान निर्माण केले आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते म्हणाले की, कपाळावर बुक्का आणि गळ्यात तुळशीमाळ घालून पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी तुळस वंदनीय आहे. जगात तुळशीच्या ६४ प्रजाती आढळतात, त्यातील ८ प्रजाती भारतात आहेत. पंढरपुरच्या तुळशी उद्यानात या आठ प्रजातींच्या तुळशीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे एकाचठिकाणी तुळशीच्या इतक्या प्रजाती पाहण्याचा आनंद ही आपल्याला मिळतो.

आपल्याला कृष्ण तुळस, राम तुळस माहित आहे, त्याशिवाय भारतात आढणाऱ्या तुळशी प्रजाती आपण इथे पाहू शकतो.त्याची माहिती घेऊ शकतो. हे उद्यान यमाई तलावाजवळ आहे, येथे ६० स्थानिक तर ४५ स्थालांतरित पक्षांची नोंद झाली आहे. हे उद्यान श्री यंत्रावर आधारित आहे. त्रिपुरा शक्तीचे प्रतीक असलेल्या या उद्यानाच्या त्रिकोणामध्ये सदाफुली, मोगरा, गुलाब, विविध रंगांच्या शेवंती, शोभिवंत फुलांची लागवड करण्यात आली आहे. उद्यानाच्या मध्यभागी कारंजे असून येथे द्रृकश्राव्य यंत्रणा उभारण्यात आली आहे. रेखीव पायऱ्यांच्या निर्मितीतून इथे एक ॲम्पी थिएटर उभारण्यात आले आहे. येथे बकुळ, पारिजातक, सोनचाफा, पिवळाबांबू, पाम वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. संतांच्या संगमरवरी मुर्ती भाविकाना आकर्षित करतात, स्वच्छतागहांची इथे सोय करण्यात आली आहे. आषाढी,कार्तिकी, माघी आणि चैत्री अशा चार प्रमुखवेळी वारकरी पंढरपुरात येतात. त्यात आषाढी ला १० ते १२ लाख वारकरी आणि भक्तगण असतात तर इतरवेळी चार ते पाच लाख. या परिसरात दररोज २ ते ३ हजार लोक सकाळी पायी फिरण्यासाठी येतात. या सर्वांचे मन प्रसन्न करणारं तुळशी उद्यान सर्वांना नक्की आवडेल असेच आहे… असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.