नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “सावजी मटण खाल्लं तर मी महिनाभर आजारी पडेन,” असे वक्तव्य मुंढे यांनी एका कार्यक्रमात केले होते. या विधानावर विदर्भातील सावजीप्रेमी आणि हलबा समाजाने तीव्र आक्षेप घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
हलबा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मुंढे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. सावजी मटण ही केवळ खाद्यपदार्थ नसून विदर्भाच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असल्याचे सांगत त्यांनी माफीची मागणी केली.
वाद वाढल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. “मी फक्त माझ्या वैयक्तिक अनुभवाबद्दल बोललो होतो. इतरांनी सावजी खावे किंवा खाऊ नये, असे मी कुठेही म्हटलेले नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी एक अनुभवही सांगितला. “मित्राच्या आग्रहाखातर एकदा सावजी मटण खाण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा रंग आणि तेल पाहून मी फक्त एक घास खाल्ला आणि उठलो. त्यामुळे ते माझे वैयक्तिक मत आहे. माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे मुंढे म्हणाले.
दरम्यान, मुंढे यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सावजी मटणाच्या समर्थनार्थ पोस्ट करत “चला सावजी खाऊ” अशी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे “सावजी मटण” हा विषय सोशल मीडियावर चर्चेचा आणि ट्रेंडिंगचा ठरला आहे.





