नागपूर -राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. राज्यभरातील ४३४ परवानाधारक संस्थांची अचानक तपासणी करण्यात आली. या कारवाईत गंभीर त्रुटी आढळलेल्या १० कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, १३५ संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर ही धडक मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान उत्पादन केंद्रातील स्वच्छता, तांत्रिक मनुष्यबळ, गुणवत्ता नियंत्रण, औषधांच्या चाचणीच्या नोंदी, उत्पादन प्रक्रिया आणि औषधांच्या लेबलची तपासणी करण्यात आली.
काही कंपन्यांमध्ये मान्यताप्राप्त तांत्रिक कर्मचारी गैरहजर असतानाही औषधांचे उत्पादन सुरू असल्याचे आढळले. काही ठिकाणी गुणवत्ता नियंत्रण विभाग आणि औषधांच्या चाचणीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीच उपलब्ध नव्हती. तसेच उत्पादन परिसरातील अस्वच्छता, चुकीच्या उत्पादन तारखा, कच्च्या व तयार मालाच्या चाचणीच्या नोंदींचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे अभिलेख नसल्याचेही समोर आले.
औषधांच्या घटकांचे एकमेकांत मिश्रण होऊ नये यासाठी आवश्यक कार्यपद्धतीच काही ठिकाणी नसल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे औषधांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात आलेल्या संस्थांमध्ये पुणे, गोंदिया, तिरोडा, नाशिक आणि अमरावती येथील कंपन्यांचा समावेश आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. औषध निर्मितीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.





