नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या शाळा सुधारण्यासाठी कसून प्रयत्न करावे, शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी मनपाच्या शाळा निरिक्षकांना दिले. शिक्षण समितीच्या विशेष आढावा बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती स्नेहल बिहारे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ नगसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या दिवेंसदिवस कमी होत आहे. ही चिंतेची बाब असून त्यावर काय उपाययोजना करता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायला हवे.शाळेत उशीरा येणा-या व अनुपस्थित राहणा-या शिक्षकांचा पगार कापा असा दम शिक्षकांना द्या असे आदेश त्यांनी यावेळी अधिका-यांना दिले. त्याचप्रमाणे शाळा निरिक्षकाने आपली व्हिजीट बूक दरवेळी शिक्षणाधिका-यामार्फत मला सादर करावे असे आदेश त्यांनी दिले. मनपाच्या शाळेत बालवाडी व प्राथमिकच्या विद्यार्थांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण कसे सुरू करता येईल यावर विचार करा असे निर्देशही दिले. शाळेमध्ये अतिक्रमण झाल्याचे ज्या शाळा निरिक्षकांनी अधिका-यांना कळवले नाही त्या निरिक्षकांवर कार्यवाही करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शाळेच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने शिक्षकांनी युआरसीचे प्रशिक्षण घेणे सक्तीचे असल्याचेही महापौर बोलताना म्हणाल्या.
महानगरपालिकेच्या शाळेत राबविण्यात येणा-या बालवाडी प्रकल्पांचा, मनपाच्या शाळेच्या इमारतींचा रखरखाव, गणवेश वाटप, सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पुरविण्यात येणा-या सुखसुविधा व करण्यात आलेल्या कामांचा आढावा यावेळी महापौरांनी घेतला.
ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी बोलताना म्हणाले, शिक्षण विभागाचे अपग्रेडेशन व्हायचे असेल तर १ ते ४ च्या वर्गांचे पुनर्जीवन करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. महानगरपालिकेच्या जागेवर चालणा-या अंगणवाडीच्या विद्यार्थांना मनपाच्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी त्यांना कसे उद्युक्त करता येईल यावर विचार करायला पाहिजे असेही ते बोलताना म्हणाले.
बैठकीला अतिरिक्त शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर, क्रिडा निरिक्षक नरेश चौधरी, सर्व झोनचे शाळा निरिक्षक, व सर्व शिक्षण अभियानाचे अधिकारी उपस्थित होते.