Published On : Fri, Aug 4th, 2017

शक्ती आणि भक्तीमुळेच समाजाचा खरा विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

औरंगाबाद: जगामध्ये ज्या ठिकाणी अध्यात्माचे ज्ञान आहे, या ज्ञानासोबत शक्ती आणि भक्ती आहे त्या ठिकाणी समाजाचा खरा विकास होईल, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. गंगापूर तालुक्यातील श्री क्षेत्र गवळी शिवरा या ठिकाणी आयोजित श्री सदगुरु योगीराज गंगागिरी महाराज 170 अखंड हरिनाम सप्ताह सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष देवयानी पाटील-डोणगावकर,अहमदनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे-पाटील, महापौर भगवान घडामोडे,महंत रामगिरी महाराज, महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, महंत नारायण गिरी महाराज,खासदार चंद्रकांत खैरे, आमदार तथा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत बंब, आमदार सर्वश्री सुभाष झांबड, बाळासाहेब मुरकुटे, श्रीमती मोनिकाताई राजळे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड आदी उपस्थित होते.

Gold Rate
26 May 2025
Gold 24 KT 95,800/-
Gold 22 KT 89,100/-
Silver/Kg 98,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, गंगागिरी महाराजांनी शक्ती आणि भक्तीची जोपासना करत आमच्यामध्ये उर्जा प्रज्वलित राहील, अशा प्रकारचा हरिनाम सप्ताह अखंडपणे170 वर्षांपासून सुरु ठेवला आहे. खरोखरच हे एक जगातलं आश्चर्य आहे. 19 व्या शतकात सप्ताहाची सुरुवात झाली, 20 व्या शतकात सप्ताह सुरुच राहीला, पुढे एकविसावे शतक आले तरीही सप्ताह सुरु आहे. शतकामागून शतके जातील तरीही हा सप्ताह अशाच प्रकारे सुरु राहील असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, भक्तीच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने आपली मानवता जिवंत आहे. या भक्तीच्या माध्यमातून अनेक घटक एकत्र येऊन अखंड हरिनामाच्या सप्ताहात रुपांतर झाले आहे. या सप्ताहाचे प्रमुख गंगागिरीजी महाराज तसेच रामगिरीजी महाराज यांच्यामुळे आपल्याला एक नवी उमेद मिळते. जीवनामध्ये सन्मार्गाने चालण्याची संधी मिळते आणि गुरुंच्या माध्यमातून जे अध्यात्माचे ज्ञान प्राप्त होते ते चिरंतन टिकणारे असते, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मनुष्याला केवळ लौकीक ज्ञान आणि भौतिक संपत्ती प्राप्त होऊन फायदा नाही कारण ज्यांच्याकडे भौतिक संपत्ती आहे त्यांना रात्री झोप येत नाही. मात्र, बळीराजा हा आपला शेतीत राब-राब राबतो, रक्ताचं पाणी करतो त्याच्याकडे भौतिक संपत्ती नसली तरी हरिनामाचा जप केल्यानंतर त्याला रात्री शांत झोप येते. त्याला बाकीची चिंता करण्याची गरज नाही, कारण त्याला माहिती आहे, मी मेहनत करतोय तर माझा हरी माझी चिंता करतोय, ही ताकद केवळ अध्यात्मामध्ये आहे.

गुरुंनी आपल्याला जो आशीर्वाद आणि ज्ञान दिले आहे, त्या ज्ञानाची ही ताकद आहे. हेच ज्ञान खऱ्या अर्थाने आपल्याला आज्ञानापासून ज्ञानाकडे आणि शांतीकडे नेते. ही शांती तेव्हाच शक्य आहे, जेव्हा प्रत्येक व्यक्तीला हरीनामाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होईल, हे ज्ञान देण्याचे महत्वाचे कार्य गंगागिरी महाराज यांनी केले आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, मी परमपुज्य गंगागिरी महाराजांना एकच आशीर्वाद मागतो की, राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी तसेच कर्जमाफीकडून कर्जमुक्तीकडे नेण्यासाठी आणि बळीराजाच्या जीवनात परिवर्तन यावे याकरिता खऱ्या अर्थांने आम्हाला शक्ती द्या, आशीर्वाद द्या. गंगागिरी महाराजांच्या ‘ सरला’ या बेटाच्या विकासासाठीच्या प्रस्तावाचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन प्रस्तावाच्या मंजुरीसाठी मी स्वत: प्रयत्न करेन,असेही ते शेवटी म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यावेळी म्हणाले की, या अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा गेल्या 170 वर्षापासून अखंडपणे सुरु आहे. श्रध्दा आणि भक्ती शांतीमय जीवन जगण्यासाठी असे सप्ताह उपयोगी पडत आहेत. सर्वांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

या सप्ताहामध्ये प्रसादाच्या स्वरुपात 10 लाख भक्तांना बुंदीचे लाडू 8 मिनिटांमध्ये वाटण्याचा आणि एकाचवेळी 10 लाख भक्तांनी एकत्र येऊन सत्संगात सहभागी होण्याचा, असे दोन जागतिक विक्रम यावेळी घडले. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना यावेळी प्रदान करण्यात आले. या हरिनाम सप्ताहासाठी सात दिवसांमध्ये राज्यातून जवळपास 25 ते 30 लाख भक्त येऊन गेले असून, आज सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला 10 लाख भक्तगण येथे उपस्थित असल्याचे आमदार तथा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत बंब यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Advertisement