Published On : Fri, Aug 4th, 2017

राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेधः खा. अशोक चव्हाण

मुंबई : काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ला ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असून सरकारने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

गुजरात मधील बनासकांठा येथे पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेलेल्या खा. राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करून खा. चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते असल्याने त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही राज्य सरकारची जबाबदारी असताना राज्य सरकारतर्फे सुरक्षा व्यवस्थेत जाणिवपूर्वक कमरता ठेवली असे दिसून येते.

या हल्ल्यामागे निश्चितपणे विकृत मानसिकता असून देशपातळीवर भाजपचे सरकार आल्यानंतर राजकीय व्यवस्थेत अनैतिकता प्रबळ होताना दिसून येत आहे. येनकेनप्रकारे सत्ता मिळवणे व त्याकरिता पैसा, गुंडगिरी, हिंसा यासह कोणताही अलोकतांत्रिक मार्ग वापरण्याची तयारी ही भाजपची कार्यशैली राहिली आहे.


याचेच प्रतिक गुजरातमध्ये खा. राहुल गांधी यांच्यांवर झालेल्या हल्ल्यातून दिसून येते. हा हल्ला म्हणजे विरोधकांना राजकारणातून संपवण्याचा डाव आहे अशी शंका येते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत असून अशा भ्याड हल्ल्याने काँग्रेसचे नेतृत्व आणि कार्यकर्ते घाबरणार नसून या विकृत आणि देशविघातक विचारधारेचा मुकाबला अधिक जोमाने करतील असे असे खा. चव्हाण म्हणाले.