नागपूर -माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रभर तिरंगा यात्रेचे आयोजन केले. उपराजधानी नागपूरमध्ये देखील शहर काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारत माता चौकापासून शहीद चौकापर्यंत ही यात्रा झाली. यात्रेत शहर काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यात्रेबाबत बोलताना विकास ठाकरे म्हणाले, देशाच्या सुरक्षेसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अशा शहीद जवानांच्या सन्मानार्थ आणि श्रद्धांजलीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस तिरंगा यात्रा काढत आहे.
“ही कोणत्याही पक्षाचा नव्हे तर सैनिकांचा विजय –
या यात्रेबाबत भारतीय जनता पक्षाने केलेल्या टीकेवर उत्तर देताना विकास ठाकरे म्हणाले, पाकिस्तानवर झालेली विजय ही कोणत्याही एका पक्षाची नाही. ती आपल्या शूर सैनिकांनी मिळवलेली विजय आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ कुठलाही नागरिक किंवा संघटना यात्रा काढू शकते.
ठाकरे पुढे म्हणाले, “आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यात काँग्रेसने तिरंगा यात्रा आयोजित केली आहे. मग त्यामुळे भाजपच्या पोटात दुखायला काय कारण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.