Published On : Mon, Nov 23rd, 2020

गोवारी बांधवांतर्फे शहिदांना श्रद्धांजली

नागपूर : आदिवासी गोवारी शहीद दिनानिमित्त गोवारी बांधवांनी झीरो माईल स्टोनजवळील शहीद गोवारी स्मारकावर शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. २३ नोव्हेंबर १९९४ रोजी आपल्या न्याय्य हक्कासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान काढलेल्या मोर्चात चेंगराचेंगरी होऊन ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते.

या दिवसाच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी २३ नोव्हेंबरला राज्यभरातून गोवारी बांधव श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येतात. मात्र, यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सुरक्षित वावराचे नियम पाळून अत्यल्प संख्येत गोवारी बांधव स्मारकावर आले होते.

इतर गोवारी बांधवांनी आपापल्या गावीच शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

पालकमंत्री नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, आमदार प्रवीण दटके, आमदार प्रकाश गजभिये, माजी राज्यमंत्री परिणय फुके, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, प्रवीण आग्रे, विकास वाटकर आदींनी शहीद गोवारी स्मारकावर येऊन आदरांजली अर्पण केली. गोवारी समाज संघटनेतर्फे कैलास राऊत, शालिक नेवारे, साहित्यिक शेषराव नेवारे, पत्रकार शेखर लसुंते, मंगेश नेवारे, संजय हांडे, जीवन आंबुडारे आदींनी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी कवी शेषराव नेवारे यांच्या गोवारी जमातीच्या लढ्यावर आधारित ‘झीरो माईल स्टोन’ या आगामी काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे व मारोतराव नेहारे हे प्रामुख्याने उपस्थित होते.