Published On : Thu, Nov 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात १५ नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरव महोत्सव;मंत्री डॉ.वुईके यांची माहिती 

Advertisement

नागपूर:  भारतीय  स्वातंत्र्यासाठी आदिवासी समाजात क्रांतीची बिजे पेरुन  ब्रिटीशांना ललकारी देणारे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त नागपूर येथे दिनांक 15 ते 17 नोव्हेंबर या तीन दिवसीय कालावधीत भव्य जनजातीय गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर राज्यातील सूमारे 4 हजार 975 आदिवासी गावांमध्ये शासनाच्या सर्व विभागामार्फत समग्र विकासासाठी एक व्यापक मोहीम राबविली जात असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

नागपुरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात राज्यपातळीवरील होणाऱ्या या जनजातीय गौरव महोत्सवाचे उद्घाटन 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार श्यामकुमार बर्वे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
याचबरोबर आमदार रवींद्र चव्हाण विशेष आमंत्रित आहेत. याचबरोबर विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. परिणय फुके, कृपाल तुमाने, संदीप जोशी, विधानसभा सदस्य सर्वश्री डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, प्रविण दटके, मोहन मते, विकास ठाकरे, समीर मेघे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, संजय मेश्राम यांची उपस्थिती राहील. राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहील.
दिनांक 16 नोव्हेंबर रोजी चेतना परिषद तसेच आदीकर्मयोगी अभियान, प्रधानमंत्री जनमन, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान कार्यशाळा संपन्न होणार असून याला केंद्रीय जनजातीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभेल.  याचबरोबर राज्यसभा सदस्य सुमेर सिंह सोलंकी, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे माजी अध्यक्ष हर्ष चौहान, सामाजिक कार्यकर्ते चैतराम पवार, महु येथील डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रामदास आत्राम, जनजातीय कार्य मंत्रालयाच्या संचालिका दीपाली मासिरकर, आदिवासी विकास आयुक्त लिना बनसोड, लक्ष्मण मडकाम, जनजाती विशेषज्ज्ञ दीपमाला रावत आदी  मान्यवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील.
17 नोव्हेंबर रोजी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण कार्यक्रम व युवक-युवती सम्मेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सम्मेलनास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची प्रमुख उपस्थिती राहील.
याचबरोबर मध्य प्रदेश येथील जनजातीय कार्य मंत्री कुवर विजय शाह, मध्य प्रदेशच्या लोक स्वाथ्य यांत्रिकी विभागाच्या मंत्री श्रीमती संपतिया उईके, खासदार फग्गनसिंह कुलस्ते, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, माजी महापौर मायाताई ईवनाते, खासदार समीर उराव, सुरेखाताई थेतले, रंजना कोडापे, कविता राऊत हे मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला मुख्य सचिव राजेश कुमार व आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे यांची विशेष उपस्थिती राहील.
या कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयुक्त दीपा मुधोळ मुंडे, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement