नागपूर : नागपुरात भूमाफियांनी अक्षरशः कायद्याला चिरडून टाकले आहे. आतापर्यंत सामान्य नागरिकांच्या जमिनी बळकावणाऱ्या टोळ्यांनी आता सरकारी जमिनीवरही डोळा ठेवला असून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
पूर्व नागपुरातील कळमना परिसरात भूमाफिया संजय करोंडे याने सरकारी जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःचे ले-आऊट तयार करून भूखंड विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) आणि पोलिसांकडे तक्रारी दाखल असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
सरकारी जमीन खासगी मालकी दाखवून विक्री-
तक्रारदार देवचंद कारेमोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजा चिखली देवस्थान येथील नागपूर बेघर नागरी समितीचा खसरा क्र. १०५ आणि १०६ मधील ले-आऊट शेजारील खसरा क्र. १०४ ही जमीन राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (NIT) मालकीची आहे. मात्र, करोंडे यांनी ती जमीनही आपल्या ले-आऊटमध्ये दाखवून बेकायदेशीरपणे विक्री केली.
या जमिनीची सध्याची बाजार किंमत २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
करोंडे यांनी बनावट कागदपत्रांद्वारे सरकारी जमीन स्वतःची असल्याचे दाखवत अधिकाऱ्यांशी संगनमत करून विक्री केली. या प्रकारात काही नासुप्रचे अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकारीही सामील असल्याचा आरोप आहे.
आधीही गुन्हे दाखल – पण कारवाई नाही-
संजय करोंडे याचे नाव यापूर्वीही कुख्यात गुंड रणजीत सफेलकर यांच्यासोबतच्या अतिक्रमण प्रकरणात आले आहे. एप्रिल २०२१ मध्ये रवी दिकोंडवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सफेलकर, करोंडे आणि इतरांविरुद्ध भूखंड हडपल्याचा गुन्हा दाखल केला होता.
तथापि, कारवाई न झाल्याने करोंडे अधिक बेधडक झाला. कळमना परिसरात त्याने काही राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे मिळालेल्या जमिनीवर भूखंड आणि गोदाम जागा दिल्या असल्याचे समजते.
पोलिसांवर दबाव, तक्रारी दडपल्या जात असल्याचा आरोप-
या टोळीने अलीकडेच एका व्यक्तीवर हल्ला करून त्याच्या कानाशी पिस्तूल रोखले, अशीही माहिती समोर आली आहे. मात्र, संबंधित कळमना पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी प्रकरण दडपल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, “करोंडे यांनी पोलिस, नासुप्र अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांवर दबाव आणला आहे. त्यामुळे डझनभर तक्रारी असूनही कोणतीही कारवाई होत नाही.”
प्रशासन भूमाफियांच्या दबावाखाली?
या प्रकारामुळे नागपुरात भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचे संगनमत उघड झाले असून, नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सरकारी जमिनीवर बेकायदेशीर व्यवहार, अधिकाऱ्यांचा मूक पाठिंबा आणि पोलिसांची निष्क्रियता यामुळे संपूर्ण व्यवस्था भूमाफियांच्या ताब्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.










