
नागपूर– राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंगणा बसस्थानकाच्या नव्या इमारतीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. बसस्थानकातील महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या हिरकणी कक्षासह इतर प्रवासी सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरू असलेल्या बांधकामांची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.
याआधी शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. पाहणीदरम्यान राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, उपाध्यक्ष व प्रादेशिक व्यवस्थापक माधव कुसेकर, विभाग नियंत्रक विनोद चौरे, विभागीय वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे, अभियंत्रचालक नेवारे, इमामवाडा आगार व्यवस्थापक इम्रान खान यांसह नागरिक उपस्थित होते.
हिंगणा परिसरातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या बसस्थानकामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.









