Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jun 10th, 2019

  तृतीयपंथी चमचमचा मृत्यू

  प्रचंड तणाव

  File photo

  नागपूर : तृतीयपंथीयांचे नेतृत्व करण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला झाल्याने गेल्या सात दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या तृतीयपंथी चमचम गजभियेचा सोमवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालय परिसर आणि तृतीयपंथीयांचे वास्तव्य असलेल्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, कळमना पोलिसांनी या प्रकरणात हत्येच्या गुन्ह्याचे कलम ३०२ नोंदविले आहे.

  कळमन्यातील कामनानगरात मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास तृतीयपंथीयांचा गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह चमचम गजभियेवर प्राणघातक हल्ला चढवला होता. तेव्हापासून चमचम अत्यवस्थ अवस्थेत होती. तृतीयपंथीयांच्या गटाची गादी (गुरू पद) आणि रोजच्या कमाईतील हिस्सा मिळावा यासाठी सध्याचा गुरू उत्तमबाबा याला चमचमने विरोध चालविला होता. त्याने आपला गट निर्माण केला, तो रोजची हजारोंची कमाई लपवून योग्य तेवढा हिस्सा प्रामाणिकपणे देत नसल्याचे लक्षात आल्याने उत्तमबाबा त्याच्यावर चिडून होता. गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या हिस्सेवाटणीमुळे ही धुसफूस तीव्र झाली होती. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी दुपारी १.३० वाजता रोजची फेरी आटोपून प्रवीण ऊर्फ चमचम प्रकाश गजभिये आणि तिचे साथीदार घरी परतले होते. चमचमच्या कामनानगरातील घरी ते पैशाची हिस्सेवाटणी करून पांगले असतानाच उत्तमबाबा, चट्टू ऊर्फ कलम उईके, किरण गौरी, निसार शेख आणि साथीदार चमचमच्या घरी पोहचले. त्यांनी चमचमवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला होता. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली. चमचमला तिच्या सहकाऱ्यांनी कामठी मार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल केले.

  औषधोपचारावर हजारोंचा खर्च करूनही चमचमच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे शहरातील तृतीयपंथीयांनी तिला दुसऱ्या एका रुग्णालयात हलविले होते. तेथील डॉक्टरांनी सोमवारी रात्री चमचमला मृत घोषित केले. हे वृत्त कळताच मोठ्या संख्येत तृतीयपंथीयांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी तेथे जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे रुग्णालयासमोर प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलिसांचा मोठा ताफा तेथे पोहचला. चमचमच्या मृत्यूमुळे कळमन्यासह तृतीयपंथीयांचे वास्तव्य असलेल्या अनेक परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री कळमना पोलिसांनी या प्रकरणात हत्येच्या गुन्ह्याचे कलम ३०२ नोंदविले आहे. घटनेच्या काही तासानंतरच पोलिसांनी मुख्य आरोपी उत्तम बाबा, कलम उईके, किरण गौरी, निसार शेख आणि लखन पारशिवनीकर यांना अटक करण्यात आली होती.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145