Published On : Fri, Jun 4th, 2021

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Advertisement

वैनगंगा नदीवर बचाव कार्याचा सराव
प्रात्यक्षिकाद्वारे माहिती

भंडारा:- पावसाळा येऊ घातला असून अतिवृष्टी व पुरामुळे येणाऱ्या आपत्तीमध्ये बचाव कार्य कसे करावे याची रंगीत तालीम राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने वैनगंगा नदीच्या पात्रात करण्यात आली. नदीकाठावर असलेल्या गावातील तलाठी व ग्रामसेवक यांनी आपत्तीच्या समयी कशाप्रकारे बचाव कार्य करावे याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. जिल्हाधिकारी संदीप कदम, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक सुरेश कराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्यांनी पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीना कशाप्रकारे वाचवावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

अतिवृष्टीमुळे अचानक पूरपरिस्थिती निर्माण होते. अशावेळी नदी काठावरील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थानांतरण करणे जिकरीचे काम असते. काही वेळा व्यक्ती पाण्यात सुद्धा बुडतात. अशावेळी प्रशिक्षित व्यक्ती असेल तर प्राण वाचविणे शक्य होते तसेच पुरात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थालांतरित करणे सोयीचे ठरते. हीच बाब लक्षात घेऊन राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे प्रशिक्षण देण्यात आले.

स्वयंचलित बोटीच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविणे, पुराणे वेढलेल्या गावात बचाव कार्य व राहत सामुग्री पोहोचविणे, गरोदर महिला व लहान मुलांचे सुरक्षित स्थानांतरण आदीची रंगीत तालीम यावेळी घेण्यात आली. बचाव कार्य करतांना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक कराडे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या चमूने प्रत्यक्ष वैनगंगेच्या पत्रात उतरून सराव करून दाखविला. आपत्ती ही सांगून येत नसून यंत्रणेने कायम सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ असे आपण नेहमी म्हणतो. याचा अतिशय योग्य उपयोग राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या चमूने केला आहे. वापरलेल्या पाण्याच्या बॉटलपासून उपयुक्त असे लाईफ सेव्हिंग डिव्हाईस त्यांनी बनविले व याचा कसा वापर करावा हे यावेळी सांगितले. तसेच घरातील नेहमीच्या वापरातील वस्तूंचा बचाव कार्यात वापर करावा याचेही प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. आपत्ती काळात सर्वांनी सतर्क राहून मदत केल्यास जीवितहानी होणार नाही व नागरिकांना सुरक्षितपणे यातून बाहेर काढता येते असा आत्मविश्वास या प्रशिक्षणातून मिळाला.