Published On : Tue, Sep 5th, 2017

जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी प्रशिक्षण आज

Advertisement

नागपूर: जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा जलसंधारण विभागाचे सचिव व विभागीय आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उद्या दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ.वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळच्या सत्रामध्ये ‘जलयुक्त शिवार अभियान 2017-18 अंमलबजावणीसाठी निर्गमित सूचना व कार्यपद्धती’ या विषयावर मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले हे मार्गदर्शन करणार आहेत. नागपूर विभागातील जलयुक्त शिवार अभियानाची 2016-17 मधील अंमलबजावणी आणि 2017-18 मधील नियोजनाची रुपरेषा विभागीय आयुक्त अनूप कुमार हे सांगतील.

भूगर्भ रचना व त्यानुसार पाणलोट उपचार भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे उपसंचालक माहिती देणार आहेत. मृदा व जलसंधारणासंबधी माहिती, पाणीसाठा व आर्थिक मापदंड यावर मृदा संधारणाचे संचालक मार्गदर्शन करणार असून पाण्याच्या ताळेबंद, गाव आराखडा यावरही मृदा संधारण विभागाचे अधिकारी माहिती देतील. तसेच एमआरएसएसीद्वारे विकसित आज्ञावली व सनियंत्रण प्रणाली या विषयांचा पहिल्या सत्रात समावेश आहे.

तर दुसऱ्या सत्रामध्ये जलसंधारण उपचार दुरुस्ती व तांत्रिक तसेच आर्थिक मापदंड, अप्रत्यक्ष सिंचनामध्ये पाणी वाटप व्यवस्था, जलयुक्त शिवार अभियान, जलसंधारण मोहीम व नरेगा अभिसरण आणि मागेल त्याला शेततळे याविषयावर संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रशिक्षणासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोजगार हमी योजनेचे उपायुक्त पराग सोमण यांनी केले आहे.