Published On : Tue, Sep 5th, 2017

‘नया भारत- हम करके रहेंगे’ प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज उद्घाटन

नागपूर: ‘नया भारत- हम करके रहेंगे’ या नवीन पुढाकाराचा एक भाग म्हणून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयाच्या सहाय्याने 6 ते 10 सप्टेंबर 2017 दरम्यान प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक राणी कोठी , सिव्हिल लाइन्स येथे केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्या बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

डीएव्हीपीद्वारे तयार केलेल्या या छायाचित्र प्रदर्शनात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या गीत आणि नाटक विभागाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. दिनांक 6 ते 10 सप्टेंबर 2017 दरम्यान सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्व जनतेसाठी खुले राहणार आहे.

प्रदर्शन शिक्षणतज्ञ आणि सामान्य जनतेसाठी एक उत्साही अनुभव असेल. नागपूरमधील अनेक नामवंत, विविध मान्यवर आणि तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्या विषयी व शासनाद्वारे नव्या भारताच्या (न्यू इंडीया) निर्मितीसाठी घेतलेल्या उपक्रमांसंदर्भातल्या विविध विषयांवरील प्रश्नमंजुषा, चित्रकला आणि निबंध लेखन स्पर्धांमध्ये शहरातील महाविद्यालय आणि शाळा सहभागी होणार आहेत.

भारत छोडो आंदोलनाच्या 75 व्या वर्षापूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘नया भारत- हम करके रहेंगे’ किंवा ‘न्यू इंडिया-वी रिझॉल्व्ह टू मेक’ ही या प्रदर्शनाची मूळ संकल्पना असेल.

देशभरातील 37 ठिकाणी अशा प्रदर्शनांचे आयोजन केले जात आहे. या प्रदर्शनाचा केंद्रबिंदू 1857 ते 1947 पर्यंतच्या काळात झालेली भारताची स्वातंत्र्य चळवळ आहे. “स्वातंत्र्याचे प्रथम युद्ध, 1857”, “चंपारण सत्याग्रह”, “असहकार चळवळ “,” दांडी यात्रा” आणि “भारत छोडो आंदोलन” अशा चळवळीच्या विविध महत्वपूर्ण आंदोलनाची माहिती सदर प्रदर्शनातून मिळेल. याशिवाय, 1942 ते 1947 या दरम्यान ब्रिटिश सरकारविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळीने संपूर्ण देशात झालेले परिवर्तन या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवले जाईल. 2017 ते 2022 पर्यंत नवीन भारताचा दृष्टीकोनही याप्रसंगी प्रदर्शित केला जाईल. तसेच केंद्र शासनाने सुरू केलेल्या व्यापक मोहीमेशी सुसंगत असा हा कार्यक्रम आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या गीत आणि नाटक विभागाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुणे येथील गीत आणि नाटक विभागाद्वारे कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील सांस्कृतिक मंडळांद्वारे महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला गण, गवळण, पोवाडा, भारूड, गोंधळ यांसारख्या विविध माध्यमातून सादरीकरण केले जाणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमांचा उद्देश हा मनोरंजनाद्वारे जनजागृती करणे आहे.