
नागपूर : माणकापूर परिसरात मंगळवारी दुपारी रंगकाम करताना इमारतीवरून खाली पडून एका २६ वर्षीय पेंटरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मृत पेंटरचे नाव कमलेश उमराव सोमकुंवर (वय २६, रा. समता नगर, अंबाटोळी, जरीपटका) असे असून, तो अलेक्झिस हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या एका इमारतीवर बाहेरील भिंतीवर रंगकाम करत होता. दुपारी सुमारे १२.३० वाजता दोरीच्या झोक्यावर काम करताना त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला.
या अपघातात कमलेशच्या डोक्याला आणि छातीत गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान २९ ऑक्टोबरच्या पहाटे १.३८ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वैद्यकीय माहितीच्या आधारे माणकापूर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रांजली आंबेडकर करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.










