मनपा आयुक्तांचे आदेश : भीम चौक ते रिंग रोड पर्यंत वाहतूक प्रतिबंधित
नागपूर : सीमेंट रोड बांधकामाकरिता भीम चौक ते रिंग रोड (डम्पिंग यार्ड रोड) पर्यंतची वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.
नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा ३ मधील रस्ता क्रमांक ११ अंतर्गत भीम चौक ते रिंग रोड (डम्पिंग यार्ड रोड) साखळी क्रमांक ७२० ते १२५० सीमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने ३० एप्रिल २०२१ ते ३० जून २०२१ या कालावधीमध्ये उपरोक्त मार्गावरील वाहतूक त्या रस्त्यास समांतर वाठोडा रोड मार्गे वळविण्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश दिले आहे.
याशिवाय काम सुरू असलेल्या ठिकाणी महत्वाच्या उपाययोजना करण्याचेही आयुक्तांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावून काम सुरू झाल्याची व पूर्ण करण्याची दिनांक नमूद करणे. कंत्राटदाराने स्वतःचे नाव व संपर्क क्रमांकाचे फलक लावणे, पर्यायी मार्ग सुरू होण्याच्या व संपण्याच्या ठिकाणी तसेच बॅरिकेड्स जवळ सुरक्षा रक्षक किंवा स्वयंसेवक नेमावे. वाहतूक सुरक्षा रक्षक, वाहतूक चिन्हाचा पाट्या, कोन्स, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, एजईडी बॅटन, ब्लिकर्स आदी संसाधने उपलब्ध करावे. काम सुरू झाल्यानंतर जमीनीतून निघणारी माती, गिट्टी आदी रस्त्यावर टाकू नये. मार्गावरील रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ बुजवावे.
पर्यायी मार्गाच्या ठिकाणी वळण मार्गाचे सविस्तर माहिती फलक लावणे, रात्रीच्या वेळी एलईडी डायव्हर्शन बोर्ड लावणे, बॅरिकेड्स वर एलईडी माळा लावणे, उजव्या बाजुने दुतर्फा वाहतूक चालणा-या ठिकारी अस्थायी रस्ता दुभाजक तयार करून एकाच मार्गावरून दुतर्फा वाहतूक वळविणे, वाहतूक नियमांचे तसेच वाहतूक पोलिसांनी दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करणे, रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरिकांच्या सोयीकरीता आवश्यक व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

