‘कोव्हिड संवाद’मध्ये बालरोग तज्ज्ञांचा सल्ला
नागपूर : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत जात आहे. पहिली लाट ही ज्येष्ठांसाठी घातक ठरली तर दुसरी लाट ज्येष्ठ आणि तरुणांसाठीही धोकादाक ठरत आहे. अशात तिस-या लाटेमध्ये बालकांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या १८ वर्षावरील सर्वांसाठी लस उपलब्ध आहे. मात्र बालकांसाठी अद्यापही लस येण्यास आहे. याबाबत विदेशामध्ये विविध संशोधन सुरू आहेत. मात्र अशा स्थितीमध्ये मास्क आणि इतर सुरक्षा हेच मोठे शस्त्र आहे. मात्र लहान मुले मास्क लावत नसल्याची अनेक पालकांची तक्रार असते. दोन वर्षावरील बालकांना समज आलेली असते अशात ते पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी स्वत: सुद्धा मास्क लावावे व बालकांना त्यांच्या आकाराचे मास्क देउन त्यांनाही मास्क लावण्याची सवय लावावी, असा सल्ला शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद मंडलिक व डॉ. अनिल राउत यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये दिला.
नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शुक्रवारी (ता.६) डॉ.मिलिंद मंडलिक आणि डॉ.अनिल राउत यांनी ‘बालकांमधील कोव्हिड आणि लसीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले व यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण केले.
सध्याच्या या लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये मागील वर्षभरापासून लहान मुले घरात बसून आहेत. शाळा, बाहेर जाणे, मित्रांसोबत खेळणे, गप्पा मारणे हे सर्व बंद असल्याने त्यांचा बाहेर कुणाशी संपर्क येत नाही. अशा स्थितीत घरातील मोठे व्यक्ती जे कामानिमित्त वा इतर कारणानिमित्त घराबाहेर जातात व पुन्हा घरात परत येतात त्यांच्याशीच त्यांचा संपर्क येतो. घराबाहेर गेलेली एखादी व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास बालकांना सुद्धा कोरोना होउ शकतो. मात्र बालकांमध्ये कोरोनाचे गंभीर लक्षण आढळत नाही. मात्र ते ‘सुपर स्प्रेडर’ ठरू शकतात. घरातील आजोबा, आजी यांच्या संपर्कात ती येतात त्यामुळे ज्येष्ठांना त्यांच्यामुळे धोका ठरू शकतो. अशा स्थितीमध्ये घरातील सर्व मोठ्या व्यक्तींनी सुरक्षेची सर्व काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेरून आल्यानंतर आधी साबण व पाण्याने हात धुवावे, मास्क लावावा त्यानंतरच बाळाच्या जवळ जावे, असाही सल्ला डॉ. मिलिंद मंडलिक व डॉ. अनिल राउत यांनी दिला.
आई आणि वडील कोरोना पॉझिटिव्ह असणे व बाळाचा अहवाल निगेटिव्ह असणे किंवा बाळ पॉझिटिव्ह व आई वडील निगेटिव्ह असणे असे अनेकदा घडते. अशा स्थितीमध्ये बाळाला एकटे ठेवणे शक्य नसते. यावेळी पालक मुलांना थेट आजी आजोबांकडे सोपवितात. मात्र इथेच धोका निर्माण होउ शकतो. बाळ पॉझिटिव्ह असेल व आई निगेटिव्ह असेल तर त्याची काळजी घेण्यासाठी आईने सोबत रहावे. किंवा बाळ निगेटिव्ह आई वडील पॉझिटिव्ह असेल तरी सुद्धा बाळाला सोबत ठेवावे. बाळाला स्तनपान करताना आईने मास्क लावावे, स्तनपान झाल्यानंतर बाळाला स्वत:पासून दूर ठेवावे. स्तनपानामुळे बाळाला कोरोना होत नाही. तसेच गर्भवती महिला कोरोनाबाधित असेल तरी सुद्धा बाळाला कोरोना होत नाही. बाळाच्या आमोरासामोरच्या थेट संपर्कामुळेच कोरोनाचा संसर्ग होउ शकतो. त्यामुळे मास्क हे सुरक्षेचे मोठे शस्त्र आहे. घरातील सर्व व्यक्तींनी मास्क लावून बाळांना त्याचे अनुकरण करण्यास शिकवावे. आजच्या या घडीत सुरक्षा हेच सर्वोत्तम औषध आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन डॉ. मिलिंद मंडलिक व डॉ. अनिल राउत यांनी केले.
