पाटणा : देशभरातील विरोधी पक्षातील नेते आज भाजपाविरोधात मोट बांधण्यासाठी पाटणा येथे एकत्रित येणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशभरातल्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केले आहे.
यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी खासदार राहुल गांधी या बैठकीसाठी पाटणा येथे दाखल झाले आहेत. या बैठकीआधी राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. आज येथे सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. एकत्र येऊन आम्ही भाजपाला हरवणार आहोत, असेही ते म्हणाले.
भाजपाकडून देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. मात्र आम्ही लोकांना जोडण्याचे काम करीत आहोत. आम्ही देशात प्रेम पसरवण्याचे काम करत आहोत.तिरस्काराला संपविण्यासाठी प्रेमाच्या आवशक्यता असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपाला धडा शिकविला. भाजपच्या अनेक प्रयत्नानंतरही काँग्रेसने याठिकाणी दणदणीत विजय मिळविला. हे पाहता आगामी काळात तुम्हाला तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपा दिसणार नाही, केवळ काँग्रेस दिसेल, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. भाजपावाले सत्तेत आले की केवळ दोन-तीन लोकांचा फायदा होतो. देशाची सगळी संपत्ती या लोकांना मिळते. परंतु काँग्रेस ही गोरगरीबांबरोबर असल्याचे ते म्हणाले.