Published On : Wed, Aug 11th, 2021

आज महाराष्ट्राची मान शरमेने झुकली असेल : ॲड.धर्मपाल मेश्राम

मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणे ही लज्जास्पद बाब

नागपूर. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून महाराष्ट्राला अनेक मोठ्या मुख्यमंत्र्यांचा वारसा लाभला आहे. राज्याच्या निर्मितीपासून लाभलेल्या या मुख्यमंत्र्यांनी राज्याला एका वेगळ्या उंचीवर नेउन ठेवले. केंद्रामध्ये महाराष्ट्राचे नाव एका वेगळ्या आदराने घेतले जाते. मात्र आज महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्याने संपूर्ण देशात महाराष्ट्राची मान शरमेने झुकली असेल, असे मत भाजपाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर पुढे शरद पवार ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेकांनी राज्याला आदर्शतेच्या दिशेने नेण्यामध्ये मोठे योगदान दिले. अशा राज्याचा कारभार जिथून चालविला जातो त्या मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणे ही संपूर्ण राज्यासाठी लज्जास्पद बाब आहे.

मंत्रालयामध्ये जाण्यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था पार करून जावे लागते. मात्र त्यानंतरही जर निर्धास्तपणे येथे दारूच्या बाटल्या नेल्या जात असतील तर तिथे शस्त्र, हत्यारे, दारूगोळा, बॉम्ब पोहोचायलाही वेळ लागणार नाही. अशा स्थितीत मंत्रालयातील सुरक्षा रक्षक नेमके काय करत होते हा प्रश्न निर्माण होत आहे. या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणे आणि महाराष्ट्राला जनतेला त्यामागील सत्यकथन करणे अत्यंत आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून सुरक्षा यंत्रणा सांभाळणारे अधिकारी व ज्या ठिकाणी बाटल्या सापडल्या ते संशयीत यांची सुद्धा सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.