| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Feb 28th, 2018

  महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान केंद्र उभारण्यात यावीत- महादेव जानकर

  नवी दिल्ली: कृषी विज्ञान केंद्रांच्या धर्तीवर महाराष्ट्रात पशुधन जास्त असणाऱ्या भागात पशु विज्ञान केंद्र तर समुद्र किनारी भागात मत्स्य विज्ञान केंद्र उभारण्यात यावीत, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी केली.

  येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) ए.पी.शिंदे सभागृहात आयोजित आयसीएआरच्या ८९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री. जानकर बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कृषी व कृषी कल्याण मंत्री राधामोहन सिंह होते. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री सर्वश्री गजेंद्र सिंह शेखावत, कृष्णा राज, पुरुषोत्तम रुपाला, आयसीएआरचे सचिव तथा महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्र मंचावर उपस्थित होते.

  बैठकीस उपस्थित विविध राज्यांच्या मंत्र्यांनी सूचना मांडल्या. महाराष्ट्राच्यावतीने बोलताना श्री. जानकर यांनी २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पशु व मत्स्य क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगितले. या दिशेने पावले उचलत महाराष्ट्रातील पशुधन जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पशु विज्ञान केंद्र उभारण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. या केंद्राच्या माध्यमातून पशुधन विकासाबाबत विविध संशोधन होतील आणि या व्यवसायावर आधारित रोजगारांच्या संधीही उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. राज्याला ७२० किलो मीटर समुद्र किनारा लाभला असून समुद्र किनारी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. त्यामुळे या भागात मत्स्य विज्ञान केंद्र उभारण्यात यावे, असे केंद्र उभारल्यास संशोधन कार्याच्या माध्यमातून या भागातील मत्स्य उद्योगाचा विकास होईल, असेही श्री. जानकर म्हणाले.

  महाराष्ट्रात पशु व मत्स्य केंद्र उभारण्यास केंद्र सरकार सकारात्मक असून यासंदर्भात अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय कृषी तथा कृषी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांनी यावेळी सांगितले. श्री. जानकर यांनी यावेळी राज्यात पशु व मत्स्य विज्ञान केंद्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्तावही राधामोहन सिंह यांना दिला.

  मत्स्य शेतीस कृषीचा दर्जा देण्यात यावा, राज्यातील पशुंच्या लसीकरणासाठी लसी उपलब्ध व्हाव्यात, राष्ट्रीय डेअरी विकास केंद्राच्या माध्यमातून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये डेअरी विकास कार्यक्रम राबविण्यात यावा, अशा मागण्याही श्री. जानकर यांनी यावेळी केल्या.

  विविध राज्यांचे कृषी, पशु संवर्धन व मत्स्य विकास मंत्री, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञापीठांचे कुलगुरु यांसह अकोल्याचे खासदार तथा आयसीएआरच्या नियामक मंडळाचे सदस्य संजय धोत्रे या बैठकीस उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145