Published On : Tue, Jun 30th, 2020

ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणकडून तक्रार निवारण मेळावे, वेबिनारचे आयोजन

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहे. या अनुषंगाने नागपूर शहर आणि ग्रामीण सह वर्धा जिल्ह्यात तक्रार निवारण मेळावे ठिकठिकाणी सुरु करण्यात आले असून वेबिनारसह विविध माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधण्यात येत आहे अशी माहिती नागपूर परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली आहे.

महावितरण कडून वीज ग्राहकांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निराकरण महावितरणच्या लेखा, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कर्मचाऱ्याकडून केल्या जात आहे.

नागपूर परिमंडलातील वीज ग्राहकांशी वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. यावेळी नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके, महाव्यस्थपाक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उप महाव्यस्थपाक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे,कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर उपस्थित होते. व्यवस्थापक (वित्त व लेखा) विकास बांबल यांनी वेबीनारमध्ये उपस्थित ग्राहकांना जून-२०२० महिन्यात आलेल्या वीज देयकाची वस्तुस्थिती समजावून सांगितली. वेबिनारमध्ये नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सुमारे ५१५ वीज ग्राहकांनी उपस्थिती लावली.


हुडकेश्वर उपविभागात येणाऱ्या हुडकेश्वर खुर्द,सालई गोधणी, पीपल, सरसोली, चिकना, धामणा या ग्रामपंचायतीच्या हद्दीत महावितरणकडून २८ जून पासून तक्रार निवारण मेळावे सुरु करण्यात आले आहेत. यात महावितरणचे स्थानिक शाखा अभियंता राजेश आकरे, स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांच्या उपस्थित स्थानिक वीज ग्राहकांच्या शंकाचे निराकरण केल्या जात आहे. रविवार दिनांक २८ जून रोजी पिपळा घोगली येथे आयोजित मेळाव्यात १०३ वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. सोमवार दिनांक २९ जून रोजी हुडकेश्वर खुर्द येथे तक्रार निवारण मेळावा घेण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट येथील विभागीय कार्यालयात हेल्प डेस्क सुरु करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता डॉ. सुरेश वानखेडे यांनी दिली आहे. वर्धा शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी बोरगाव रोड येथील कार्यालयात तक्रार निवारण मेळावा घेण्यात आला.

सोमवार, दिनांक २९ जून रोजी उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे यांनी उमरेड येथील येथील पंचायत समिती सभागृहात जाऊन उपस्थित सभापती, सदस्य आणि अन्य शासकीय अधिकाऱ्यांना जून महिन्यात आलेल्या देयकाच्या अनुषंगाने माहिती दिली. या अगोदर पारशिवनी पंचायत समिती सभागृहात जाऊन उपस्थिताना सावनेरचे कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे आणि पारशिवनी उप विभागाचे उपकार्यकारी अभियंता गजानन डाबरे यांनी माहिती दिली.हिंगणा उपविभागात येणाऱ्या अडेगाव आणि कवडस येथे उपकार्यकारी अभियंता वैभव नाईक यांनी उपस्थित वीज ग्राहकांना जून महिन्यात आलेल्या वीज देयकांच्या संदर्भातील माहिती दिली.

महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाच्या वतीने दिनांक २ जुलै पासून ग्रामीण भागातील विविध कार्यालयात वीज ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे. पहिल्या दिवशी काटोल विभागातील वीज ग्राहकांशी संवाद साधल्या जाणार आहे.

जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी १ जुलै पासून उपविभाग निहाय वीज ग्राहकांसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील मानेवाडा उप विभागात येणाऱ्या वीज ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी दिनांक २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी वीज ग्राहकांनी meet.google.com/ofd-zopb-udk येथे लॉग इन करायचे आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. सध्या, मीटर रीडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. वीजग्राहकांनी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन आपले बिल तपासून घ्यावे. काही चूक किंवा शंका आढळली तरच महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.