Published On : Tue, Sep 28th, 2021

बालकांचे कुपोषण टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींच्या योग्य पोषणापासून सुरुवात करणे गरजेचे – कुंभेजकर

– क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, नागपूर तसेच महिला-बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, नागपूर यांच्या वतीने पोषण माहनिमित्त वेबिनारचे आयोजन,‘गंभीर तीव्र कुपोषित मुलांची ओळख व पौष्टिक अन्नाचे वितरण’ विषयावर वेबिनारमध्ये मार्गदर्शन

नागपूर: प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र-गोवा राज्य), पुणे, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, नागपूर तसेच महिला-बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, नागपूर यांच्या वतीने आज पोषण माहनिमित्त वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

‘गंभीर तीव्र कुपोषित मुलांची ओळख व पौष्टिक अन्नाचे वितरण’ विषयावर या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी, सचिन जाधव हे अधिकारी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

Advertisement

महिला व बाल विकासासाठी नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी दिली. किशोरवयीन मुलींचे योग्य पोषण, गर्भवती महिला, बालके या सर्वांची काळजी या योजनांमधून घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. कुपोषणांच्या कारणांचा आढावा घेऊन ते दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यानिमित्ताने ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेची देखील माहिती त्यांनी दिली. कोविड काळात देखील घरोघरी जाऊन अंगणवाडी मधील मुलांवर लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गर्भवती महिलांनी कोविड लसीकरण करून घेण्याचे आवाहन कुंभेजकर यांनी याप्रसंगी केले.

डॉ. दीपक सेलोकर यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून ‘बालकांचा आहार व कुपोषणाची कारणे’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कुपोषणाचे चक्र कसे काम करते याबद्दल सांगितले. आहार- वजन- वाढ- रोगप्रतिकारक शक्ती- आजार असा क्रम असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

सचिन जाधव यांनी कुपोषित बालके कशी ओळखायची आणि त्यांना कुपोषणापासून कसे दूर करायचे याबद्दल यावेळी माहिती दिली.

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, अमरावतीचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, नागपूरचे क्षेत्रीय प्रचार सहायक संजय तिवारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement