नागपूर,: राज्याच्या महसूल मंत्री पदाची जबाबदारी पार पाडत पालकमंत्री म्हणून असलेल्या जबाबदारीला न्याय देता यावा या भावनेतून चंद्रशेखर बावनकुळे हे आवर्जून जनता दरबार हा उपक्रम राबवितात. दिनांक 11 मे रोजी आयोजित केलेल्या जनता दरबारात एक महिला डबडबल्या डोळ्यांनी दहावीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला घेऊन त्यांना भेटली. दीपाली सावरकर तिचे नाव. मिस्तरी काम करणाऱ्या तिच्या पतीला अपघातात अपंगत्व आले. हाताचा रोजगार सुटला. पुन्हा उभारीसाठी तिच्या पतीने शासनाकडून ई-रिक्षा मिळावी असे स्वप्न बाळगले होते.
त्यांचा दुदैवी मृत्यु झाल्याने संघर्षाची ही बीजे घेऊन दीपाली सावरकर हीने आपल्या मुलीला जवळच्या नातलगाकडे शिक्षणासाठी पाठविले.
पतीच्या ई-रिक्षाबाबत असलेल्या इच्छेला तिने आपले ध्येय बाळगून स्वयंरोजगाराचा मार्ग घेता येईल का यासाठी संघर्ष सुरु केला. यातच जनता दरबाराचा मार्ग तिला सुचविण्यात आला. 11 मे रोजी आपल्या संघर्षाची कहानी तिने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितली.
जनता दरबाराचे कामकाज संपले पण त्यांची अस्वस्थता संपली नाही. काही करता येईल का हा विचार करुन त्यांनी तत्काळ ई-रिक्षाची मागणी नोंदविली. दुसऱ्याच दिवशी दिनांक 12 मे रोजी त्यांनी दीपाली व दहावीत शिकणाऱ्या तिच्या हस्तीका या लेकीला निमंत्रित केले. धीर देऊन तातडीने मागविलेला ई-रिक्षा दीपालीच्या हवाली करताना तेही भारावले. स्वयंरोजगाराचे एक स्वप्न पूर्ण होताना गहिवरलेल्या मायलेकीकडे उपस्थितही साक्षीदार होताना भारावले नसतील तर नवलच. रिक्षा पाठोपाठ हस्तीकाच्या शिक्षणाचीही जबाबदारी त्यांनी घेतली.