Published On : Fri, Oct 6th, 2017

निर्धारित केलेल्या जबाबदा-यांचे तंतोतंत पालन करावे – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर: प्रशासकीय अधिका-यांवर निर्धारित केलेल्या जबाबदा-यांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्यात कुठलीही हलगर्जीपणा चालणार नाही, असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ताजबाग येथील उर्स २०१७ च्या व्यवस्थेच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत दक्षीण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, ताजबाग दर्गा समितीचे प्रशासक जी.एम.कुबडे, सय्यद जिल्हानी प्रामुख्याने उपस्थित होते.

ताजबागमध्ये १४ ऑक्टोबरपासून उर्स सुरू होत आहे. देशभरातून लाखो भाविक उर्समध्ये सहभागी होत असतात. त्यासंदर्भातील प्रशासनिक आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवार (ता.५) ला ताजबाग येथे घेतला. यावेळी मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. ताजबाग परिसरात सद्यस्थितीत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व्यतिरिक्त उर्स कालावधीत दोन हजार लिटर क्षमतेच्या एकूण आठ पी.व्ही.सी. पाण्याच्या टाक्या विविध ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उर्स कालावधीत भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होऊ नये याकरिता दररोज एकूण ६० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वच्छता विभागाद्वारे ताजबाग परिसरात १० शौचालये लोककर्मविभागाद्वारे बांधण्यात येणार आहे. महिला व पुरूषांसाठी प्रत्येकी ५० अस्थायी स्वरूपाचे शौचालय बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली. याव्यतिरिक्त चार मोबाईल शौचालयाची व्यवस्था परिसरात करण्यात येणार आहे. स्वच्छता विभागाचे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये २४ तास काम करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. विद्युत विभागाद्वारे परिसरात १८० हॅलोजन व पाच जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. परिसरातील रस्त्यांवरचे पथदिवे सतत सुरू ठेवण्याकरिता आवश्यक कार्यवाही सुरू आहे. उमरेड महामार्गावरील बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात आले असल्याची माहिती दिली. आरोग्य विभागाद्वारे परिसरात २४ तास दोन रूग्णवाहिका तैनात राहणार आहे. यासोबतच डॉक्टर्सची चमू तीन शिफ्टमध्ये राहणार आहे.

दिघोरी नाका ते सक्करदरा चौक, भांडे प्लॉट परिसरातील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्र्यंनी दिले. भाविकांना ताजबागमध्ये येण्यासाठी आशीर्वाद नगर, दिघोरी, मोरभवन, रेल्वे स्टेशन, कामठी, गांधीबाग येथून बसेसची सोय करण्यात आली आहे. लोककर्म विभागाद्वारे भाविकांसाठी ४५ बाय ६० मापाचे शामियाने उभारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली.

यानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस विभागाद्वारे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. ताजबाग उर्स समितीद्वारे तयार करण्यात आलेल्या नकाश्याची प्रत पोलिस विभागाला व मनपा आयुक्तांकडे देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. मार्गावरील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे. व मार्गातील होर्डिंग्स काढण्यात यावे, अशा सूचना देखील दिल्या.

महावितरण विभागाद्वारे विजपूरवठा खंडीत होता कामा नये याची विशेष दक्षता घेण्यात यावी. लोडशेडींग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त जनरेटरची व्यवस्था करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी महावितरणाला दिले.

बैठकीला कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड,कार्याकारी अभियंता मोती कुकरेजा, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चिव्हाने, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप , नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे,विभागीय अधिकारी रोहीदास राठोड, सहप्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, प्रामुख्याने उपस्थित होते.