Published On : Sun, Nov 29th, 2020

तिघाडी सरकारला मतपेढीच्या माध्यमातून जागा दाखविण्याची वेळ : संदीप जोशी

प्रभाग २६मध्ये भव्य प्रचारसभा

नागपूर, : विदर्भावर अन्यायाची परंपरा चालवण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून केले जात आहे. तीन पक्ष एकत्र येऊन तयार झालेली ही अभद्र युती असून विदर्भाला विकासापासून दूर लोटण्याचे या सरकारचे धोरण आहे. विदर्भावर अन्याय करणाऱ्या या तिघाडी सरकारला मतपेटीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखविण्याची योग्य वेळ आली आहे, असे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.

भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता.२८) प्रभाग २६ मध्ये भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या वतीने संत गोरोबा कुंभार समाज भवन येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक जितेंद्र (बंटी) कुकडे, नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, प्रमोद पेंडके, संजय अवचट, प्रवीण नरळ आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना संदीप जोशी म्हणाले, मागील ५८ वर्षांपासून पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मोतीरामजी लहाने, गंगाधरराव फडणवीस, रामजीवन चौधरी, ना. नितीन गडकरी, अनिल सोले यांनी केले आहे. ५८ वर्षात भाजपच्या विरोधात एकही उमेदवार नव्हता. काँग्रेसने कधीच उमेदवार देण्याची हिंमत केली नाही. २०१९च्या निवडणुकीनंतर राज्यात एक अभद्र युती अस्तित्वात आली. ही युती येताच विदर्भावर अन्यायाचे सत्र सुरू झाले. संपूर्ण राज्यात दुष्काळाची, पूर परिस्थिती होती. सर्वत्र नुकसान झाले. मात्र विदर्भासोबत याबाबतही सावत्र वागणूक देण्यात आली. अमरावतीपेक्षा छोट्या सिंधुदूर्ग जिल्ह्याला ४०० कोटी देणारे ११ जिल्हे असलेल्या संपूर्ण विदर्भाला १६ कोटी देते. विदर्भावर अन्याय करण्याची परंपरा. विदर्भाला खाईत लोटण्याचे षडयंत्र या सरकारचे. नागपूर शहराहस, देवळी ५० गोंदिया ४० भद्रावती ६० कोटी वापस घेतले. वापस घेतलेला पैसा बारामतीकरांना देण्यात आला. विदर्भाच्या बाबतीत अशी विखारी भावना ठेवणाऱ्यांना १ डिसेंबरला मतपेटीच्या माध्यमातून हिसका दाखवा, असे आवाहनही संदीप जोशी यांनी केले.

विकासाचे व्हिजन भाजप कडेच : आमदार कृष्णा खोपडे
अध्यक्षीय भाषणात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, विकासाचे व्हिजन हे केवळ भारतीय जनता पक्षाकडेच आहे. पदवीधरांचे प्रतिनिधी ते देशातील सर्वात क्रियाशील नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाला विकासाचे दृष्टीकोन दिले. राज्याचे नेतृत्व करताना देवेंद्र फडणीस यांनी विदर्भामध्ये विकासाला गती दिली. आज नागपूर शहरामध्ये मेट्रो पासून ते विविध राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आलेल्या आहेत. जे कधी, कुणाला जमले नाही ते भाजपाने दिले. आज राज्यातील सरकारने विदर्भाची जी अवस्था केली आहे, त्याला विधानपरिषदेत सडेतोड उत्तर संदीप जोशी देतील, असा विश्वासही आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केला.

संदीप जोशी पदवीधरांच्या समस्यांना न्याय देतील : ॲड. धर्मपाल मेश्राम
मागील ५८ वर्षापासून पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा झेंडा आहे. या मतदारसंघातील मतदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना चार वेळ प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. एकवेळ बिनविरोध निवड करून पदवीधरांनी त्यांच्या ख-या नेतृत्वाचा सन्मान केला आहे. पदवीधरांचे प्रतिनिधित्व करीत आलेले नितीन गडकरी पुढे राज्याचे मंत्री झाले त्याही पुढे देशाचे मंत्री झाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. आज संपूर्ण देशभरात त्यांच्या कामाचा डंका आहे. हे सर्व झाले केवळ पदवीधरांनी दाखविलेल्या नितीन गडकरींवरील आणि भारतीय जनता पक्षावरील विश्वासानेच. देशाचे नेतृत्व करणारा नेता देणारे हे पदवीधर संदीप जोशी यांच्याही पाठीशी त्याच विश्वासाने उभे राहतील, यात शंका नाही. विधानपरिषदेमध्ये संदीप जोशी विदर्भ आणि विदर्भातील पदवीधरांच्या समस्यांना न्याय देतील, असा विश्वास भाजपा प्रदेश सचिव तथा मनपा विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.

संदीप जोशी यांनी आज नागपूर शहराचे नेतृत्व स्वीकारताना आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक कार्याची छाप सोडली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची चर्चा होत आहे आणि हेच सामाजिक कार्य पदवीधरांपुढे ठेवून त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्यासाठी आवाहन केले जात आहे. मात्र या उलट विरोधकांकडून वेगवेगळ्या विचारधार, समाज, जातीपाती पुढे करून गलिच्छतेचे कळस गाठले जात आहे. ज्यांचे काहीच कर्तृत्व नाही त्यांना केवळ आता जातीचाच आधार दिसत आहे. मात्र आपल्या शहरातला, विभागातला आणि विदर्भातला पदवीधर कधीही विकासाची, विकासाच्या दुरदृष्टीकोनाची तुलना जातीशी करणार नाही, असाही विश्वास ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.

मेळाव्याच्या आयोजनासाठी राजेश संगेवार, सुरेश बारई, अशोक देशमुख, प्रशांत मानापुरे, प्रवीण बोबडे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.