| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Nov 25th, 2020

  संदीप जोशी यांच्या ऋणातून मुक्त व्हायची वेळ : डॉ. आर.जी.भोयर

  वर्धा/चंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीमध्ये सिनेट सदस्य असलेल्या संदीप जोशी यांनी समर्थन दिले. त्यावेळी संदीप जोशी यांनी दिलेल्या समर्थनामुळे आणि त्यांच्या मतामुळे आपण व्यवस्थापन परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो. आज पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने संदीप जोशी यांच्या त्या ऋणातून मुक्त व्हायची वेळ आली आहे, अशी भावना वर्धा येथील महिला विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.जी.भोयर यांनी व्यक्त केली.

  भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांनी वर्धा जिल्हा संपर्क दौऱ्यादरम्यान डॉ. आर.जी. भोयर यांची भेट घेतली. यावेळी आर.जी. भोयर यांनी संदीप जोशी यांच्या विजयाचा संकल्प केला.

  ते म्हणाले, आज संदीप जोशी पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहेत. भारतीय जनता पक्षाने दिलेला हा उमेदवार विधानपरिषदेत पोहोचण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहोतच. संदीप जोशी विजयी होतील, हे शंभर टक्के निश्चित आहे. मात्र त्यांना मोठ्या बहुमताने विधीमंडळाच्या वरीष्ठ सभागृहात पाठविण्याची संधी आज मिळाली. निःस्वार्थ भावनेने इतरांची मदत करणारे संदीप जोशी हे समाजकारणी विधानपरिषदेत जाणे हा विभागातील पदवीरांचा मोठा सन्मान ठरणार आहे. कुणावर कधी कसलीही वेळ आली तर मदतीसाठी मागे न पाहणाऱ्या संदीप जोशींबाबत ऐकूण होतो. त्याची अनुभूती प्रत्यक्ष घेता आली. व्यवस्थापन परिषदेत त्यांनी दिलेल्या आपुलकीच्या आधाराने त्यांच्या ऋणबंधात गुंफून आहे. आज संदीप जोशी यांच्या विजयात योगदान देऊन त्या ऋणबंधातून मुक्त होण्याची वेळ आहे. संदीप जोशी विजयी होऊन विभागातील पदवीधर, प्राध्यापक, शिक्षक, बेरोजगार आणि शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देतील, असा विश्वासही डॉ. आर.जी. भोयर यांनी व्यक्त केला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145